महामानवाच्या वस्तूंचे होणार जतन

By admin | Published: July 3, 2016 02:46 AM2016-07-03T02:46:14+5:302016-07-03T02:46:14+5:30

दीक्षाभूमीच्या पाठोपाठ शांतिवन चिचोली येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूसंग्रहालयाचा विकासही आता गतीने होणार आहे.

Heavenly things will be saved | महामानवाच्या वस्तूंचे होणार जतन

महामानवाच्या वस्तूंचे होणार जतन

Next

‘शांतिवन’ च्या विकासाला गती : केंद्र सरकारतर्फे १७ कोटी मंजूर
नागपूर : दीक्षाभूमीच्या पाठोपाठ शांतिवन चिचोली येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूसंग्रहालयाचा विकासही आता गतीने होणार आहे. केंद्र सरकारने शांतिवन चिचोलीला तब्बल १७ कोटी ३ लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित जागांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार गांभीर्याने पाऊल उचलतांना दिसत आहे. यापूर्वी नागपुरातील जगप्रसिद्ध दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस यांना ‘अ’ श्रेणीच्या पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करण्यात आला. त्यापाठोपाठ या दोन्ही ऐतिहासिक स्थळांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास करण्याच्या दृष्टीने कटिबद्ध असलेल्या सरकारने तसा आराखडा सुद्धा तयार केला आहे. यापाठोपाठ आता महामानवाशी संबंधित नागपुरातील तिसरे ऐतिहासिक स्थळ म्हणजे शांतिवन चिचोली होय. शांतिवनाच्या विकासासाठीसुद्धा राज्य व केंद्र सरकार गांभीर्याने पुढाकार घेत आहे. त्यामुळेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी शांतिवन चिचोलीसाठी तब्बल १७.३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. नागपूर ते कळमेश्वर रोडवर फेटरीपासून आत ४ किमी अंतरावर चिचोली हे गाव आहे. या गावाच्या बाहेर शांतिवन पसरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी व नागपूरच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी येथे शांतिवन परिसर उभारले आहे. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेल्या विविध प्रकारच्या वस्तू (कोट, दैनंदिन वापरातील कपडे, जोडे आदी) तसेच देशाची राज्यघटना तयार करीत असतांना त्याचा कच्चा मसुदा ज्या टाईपराईटरवर सर्वप्रथम बाबासाहेबांनी टाईप केला होता तो टाईपराईटर, बाबासाहेबांनी काढलेली चित्रे, त्याकाळचे वर्तमानपत्र याशिवाय १९५६ मध्ये नागपुरात पार पडलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याप्रसंगी ज्या तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होत बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ती बुद्धमूर्ती, आदी अनेक ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय उभारण्यात आले आहे. एक विहार आहे. परंतु या वस्तू काळाच्या ओघात नष्ट होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या वस्तू चिरकाल टिकून राहतील, अशी व्यवस्था करण्यावर भर दिला जाईल. (प्रतिनिधी)

बुद्ध आणि बाबासाहेबांच्या जीवनावर
प्रकाश टाकणारे म्युरल्सही लागणार
शांतिवन चिचोली येथील कामातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. जागेचा प्रश्न होता, तो सुद्धा सुटला आहे. शांतिवन परिसरात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित म्युरल्स किंवा चित्रे रेखाटण्यासंबंधीची योजना होती. नागपूर सुधार प्रन्यासचा प्रभार पाहत असतांना मी स्वत: त्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. आता खऱ्या अर्थाने कामाला गती मिळेल.
सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी

Web Title: Heavenly things will be saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.