महामार्गावर राखच राख
By Admin | Published: May 18, 2017 02:40 AM2017-05-18T02:40:43+5:302017-05-18T02:40:43+5:30
बोखारा, गणेशनगरी व वीज वसाहतीतील रहिवाशांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दररोज वीज केंद्रातील राखेची मेजवानी दिली जात आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ : बोखारा व वीज वसाहतीला राखेची मेजवानी
दिनकर ठवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोराडी : बोखारा, गणेशनगरी व वीज वसाहतीतील रहिवाशांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दररोज वीज केंद्रातील राखेची मेजवानी दिली जात आहे. उन्हाळा असल्याने साधारण गतीच्या वाऱ्याने या भागात सर्वत्र राख पसरली असते. हिवाळ्यातील धुक्याप्रमाणे वातावरण तयार होते. राखेमुळे जवळचे वाहनही दृष्टीस पडत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. सततच्या राखेमुळे काही असाध्य रोगांना बळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अनभिज्ञ असून अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. बेजबाबदारीने सामान्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने फेटरी ते कामठी रोडला जोडणाऱ्या चौपदरी रिंगरोडचे काम सुरू आहे. २८ किमीचा हा आऊटर चौपदरी रिंगरोड कोराडी येथून नागपूर- सावनेर महामार्गाला ओलांडून जातो. सध्या या महामार्गाचे काम बोखारा परिसरातून सुरू आहे. बोखारा नवीन वसाहत, रामनाथ सिटी, डैडम पार्क, वसाहतींना लागून या मार्गाचे काम सुरू आहे. काही मीटर अंतरावरच वीज कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या चौपदरी मार्गाचे निर्माण करताना कोराडी वीज केंद्रातील अॅशडॅममधील राख मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. राख वापरताना संबंधितांकडून पुरेशी काळजी घेतली जात नाही. सध्या ही राख निर्माणाधीन मार्गावर मोठ्या प्रमाणात पसरविली आहे. राखेचे ढीग कडेला पडले आहेत. राखेची चादर या रोडवर अंथरली असताना पुरेशा पाण्याअभावी साधारण हवेच्या झुळकीने ही राख एखाद्या वादळाप्रमाणे उडते.
काही दिवसांपासून हवेचा वेग वाढल्याने राख उडण्याचेही प्रमाण वाढले आहे. सकाळपासूनच राखेचा वावर असतो. परिणामी सामान्यांना या भागातून जाणे, राहणे अत्यंत कष्टाचे व आरोग्यास अपायकारक होत आहे. कपडे, घरातील वस्तू व खाद्यान्नावरही राखेचे थर दिसतात. याबाबत रहिवाशांनी वारंवार विनंती करूनही उपाय केले जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. दमा, क्षय व इतर आजारांना निमंत्रण देणारा हा प्रकार सर्रास सुरू आहे. ही राख अत्यंत हलकी असल्याने हवेच्या वेगाने मोठ्या प्रमाणात उडते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या राखेचा वापर करताना उन्हाळ्याच्या दिवसात काळजी घ्यावी, किमान वसाहतींना लागून असलेल्या भागात ही पसरविताना पाण्याचा वापर करावा, अशी अपेक्षा नागरिकांची आहे. परंतु संबंधितांकडून सार्वजनिक आरोग्यासाठी खबरदारी घेतली जात नसल्याने व या संदर्भात प्राधिकरण नियमानुसार दखल घेण्यात संबंधितांना भाग पाडत नसल्याने या भागातील नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
अधिकाऱ्यांचे
कानावर हात
या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक (तांत्रिक) अजय गाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत त्यांनी काही बोलण्याचे टाळले. सध्या कामाच्या व्यवस्थेमुळे बोलता येणार नाही. दोन-तीन दिवसात माहिती देतो, असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली. मार्ग तयार करताना राखेचा थर किती असावा, राख अंथरताना कोणती काळजी घ्यावी, या संदर्भातही त्यांनी बोलणे टाळले.