नागपुरात खूप फुटले फटाके, भरपूर झाले प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 08:33 PM2018-11-08T20:33:37+5:302018-11-08T20:51:27+5:30

शहरात सुरू असलेल्या विकासकामामुळेच वातावरणात प्रदूषणाची मात्रा वाढली आहे. अशात दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या टक्केवारीत निश्चितच वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाच ठिकाणी एअर क्वालिटी मॉनिटरींग करण्यात आले. पण त्याचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले नाही. मात्र दरवर्षी फटाक्यांच्या विरोधात मोहीम राबविणाऱ्या काही पर्यावरणप्रेमी संस्थांनी दिवाळीच्या रात्रीला अनुभवलेल्या वातावरणानुसार खूप फटाके फुटले, भरपूर प्रदूषण झाले, असे मत व्यक्त केले आहे.

Heavy crackers exploded in Nagpur, lot of pollution | नागपुरात खूप फुटले फटाके, भरपूर झाले प्रदूषण

नागपुरात खूप फुटले फटाके, भरपूर झाले प्रदूषण

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदूषण मंडळाकडे डाटा नाही : तज्ज्ञांच्या मते वातावरण झाले प्रदूषित न्यायालयाच्याही निर्देशाचे झाले उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सुरू असलेल्या विकासकामामुळेच वातावरणात प्रदूषणाची मात्रा वाढली आहे. अशात दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या टक्केवारीत निश्चितच वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाच ठिकाणी एअर क्वालिटी मॉनिटरींग करण्यात आले. पण त्याचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले नाही. मात्र दरवर्षी फटाक्यांच्या विरोधात मोहीम राबविणाऱ्या काही पर्यावरणप्रेमी संस्थांनी दिवाळीच्या रात्रीला अनुभवलेल्या वातावरणानुसार खूप फटाके फुटले, भरपूर प्रदूषण झाले, असे मत व्यक्त केले आहे.


गेल्या दोन वर्षात दिवाळी उत्सवात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीत दिवाळीच्या पूर्वी नोंदविण्यात आलेल्या एअर क्वालिटी इंडेक्स आणि दिवाळीत घेण्यात आलेल्या नोंदीमध्ये भरपूर तफावत दिसून आली. २०१६ मध्ये एअर क्वालिटी इंडेक्स ८९ वरून दिवाळीच्या काळात १३८ पर्यंत पोहचला होता, तर २०१७ मध्ये १३५ वरून दिवाळीच्या काळात १८२ पर्यंत पोहचला होता. एअर क्वालिटी इंडेक्सचा आकडा २०० च्या वर गेल्यास प्रदूषणाची स्थिती गंभीर होते. गेल्यावर्षी दिवाळीत एअर क्वालिटी इंडेक्स नियंत्रित होता. पण यावर्षी मोठ्या प्रमाणात फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे व शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागपूरच्या प्रदूषणाची स्थिती गंभीर नक्कीच राहील, असे पर्यावरण तज्ज्ञांना वाटते आहे. 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या दिवशी दुपारी ४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार जाहीर केलेल्या पोल्युशन बुलेटिनमध्ये नागपूर नियंत्रणात असल्याचा खुलासा केला आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीला खऱ्या अर्थाने सायंकाळी ६ नंतर सुरुवात झाली आणि रात्री उशिरापर्यंत ती सुरू होती. त्यामुळे रात्री १० नंतर शहरातील मुख्य रस्त्यांवर धुके दाटल्याचे चित्र होते. डोळे झोंबत असल्याचे अनेकांनी अनुभवले. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी काही अवधी बांधून दिला होता. परंतु सकाळी जेव्हा शहरातील काही भागांचा आढावा घेतला, तेव्हा घराघरांसमोर पडलेल्या फटाक्यांच्या कचऱ्यांवरून फटाके किती फुटले याचा अंदाज नक्कीच येत होता. 


 रस्त्यावरील जनावरे झाली गायब
एरवी रात्री उशिरा शहरातील मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचा घोळका दिसून येतो. मोकाट जनावरेही रस्त्याच्या मध्ये बसलेली दिसतात. परंतु दिवाळीच्या दिवशी रात्री उशिरा शहरातली मुख्य रस्त्यांवर एक कुत्रा सुद्धा दिसून आला नाही. रस्त्यावर बसलेली मोकाट जनावरेसुद्धा दिसली नाही.

 फटाक्यांमुळे होते तीन प्रकारचे प्रदूषण
फटाक्यांचे आवाजावर निर्बंध घातल्यानंतरही ध्वनिप्रदूषणाचा मोठा तडाखा रहिवाशी वस्त्यांमध्ये तसेच व्यापारी पेठेमध्ये बसला. वायुप्रदूषण घराबाहेर पडल्यावर जाणवतच होते. वायुप्रदूषण सर्वात घातक प्रदूषण आहे. ज्यात कॅडियम, झिंक, कॉपर, मॅगनिज, पोटॅशियमसारखे हेवी मेटल वातावरणात मिसळतात. आॅक्साईड आॅफ सल्फर व फॉस्फरस फटाक्यामुळे पसरतो. त्याचे परिणाम मानवाबरोबरच पशु आणि पक्ष्यांनाही जाणवतात. तिसरे म्हणजे सॉलिड वेस्ट सकाळी उठल्यावर घराघरापुढे फटाक्यांचा कचरा सांडला असतो. तो सुद्धा घातक असतो.

 शहरातील प्रदूषणाची आकडेवारी महामंडळाकडे नाही 

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ शहरातील पाच ठिकाणी प्रदूषणाची नोंद करते. यात सिव्हिल लाईन येथील त्यांचे कार्यालय, उत्तर अंबाझरी मार्ग, सदर, हिंगणा टी-पॉर्इंट व विभागीय आयुक्त कार्यालय. मंडळाच्या वेबसाईटवर आॅक्टोबर महिन्यापर्यंतचा डाटा या पाच ठिकाणचा दिला आहे. हे पाच ठिकाण म्हणजे संपूर्ण शहर नाही. उलट या पाच ठिकाणांपेक्षा पुलापलीकडील भागात जसे महाल, इतवारी, गांधीबाग, सक्करदरा, मेडिकल, म्हाळगीनगर, मनीषनगर, खरबी, कळमना, वाठोडा, नंदनवन या भागात तुलनेत जास्त फटाके फोडले जातात. हा रहिवासी परिसर असल्याने, दाटीवाटीने घरे असल्याने फटाक्यांची तीव्रता येथे जास्त जाणवते. पण या भागातून प्रदूषणाची आकडेवारी महामंडळाच्या माध्यमातून मिळत नाही. संपूर्ण शहरात प्रदूषणाची नोंद करायची असेल, तर किमान २० ठिकाणी मंडळाला यंत्रणा उभी करावी लागेल. 


 जनजागृती आणि कारवाईची गरज
वातावरणात प्रदूषण वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने फटाके फोडण्याची वेळही बांधून दिली आहे. पण अंमलबजावणी झाली नाही. गेल्या दोन वर्षात नागपूरचा एअर क्वॉलिटी इंडेक्स नियंत्रण रेषेच्या पलीकडे गेल्याचे दिसते आहे. शहरात सुरू असलेल्या बांधकामामुळे प्रदूषण वाढले आहे. त्यात आता दिवाळीच्या फटाक्यांची भर पडल्याने, ते नियंत्रण रेषेच्या पलीक डे गेले आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी खऱ्या अर्थाने नागरिकांमध्ये जाणीव होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती व कारवाई होण्याची गरज आहे.
कौस्तुभ चॅटर्जी, समन्वयक, ग्रीन विजिल पर्यावरणवादी संस्था

 

Web Title: Heavy crackers exploded in Nagpur, lot of pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.