नाग'पुरा'त हाहाकार! ७ तासात २२७ मि.मी. पाऊस; ५०० हून वस्त्या जलमय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 03:59 PM2024-07-20T15:59:26+5:302024-07-20T18:02:00+5:30

Nagpur : घरात पाणी, रस्त्यावर पाणीच पाणी

Heavy fainfall in Nagpur | नाग'पुरा'त हाहाकार! ७ तासात २२७ मि.मी. पाऊस; ५०० हून वस्त्या जलमय

Heavy fainfall in Nagpur

निशांत वानखेडे

नागपूर : शनिवारी या अतिवृष्टीने नागपूरकरांना जाेरदार तडाखा दिला. सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नागपुरात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून ५०० च्यावर वस्त्या जलमय झाल्या आहेत. सर्व नाले ओसंडून वाहत आहेत. रस्त्यावर पाणीच पाणी असून शेकडाे लाेकांची घरे पाण्यात बुडाली आहेत. पहाटेपासून दुपारी १२ वाजतापर्यंत मुसळधार पावसाची संततधार सुरू हाेती. ७ तासात तब्बल २२७.२ मि.मी. पावसाची नाेंद झाली. गेल्या वर्षी २३ सप्टेंबरनंतर नागपुरात आज पुन्हा पुराची परिस्थिती निर्माण झाली असून शहरभर अक्षरश: हाहाकार उडाला आहे.

मान्सून दाखल हाेवून महिनाभर झाल्यानंतरही उकाड्याचा त्रास सहन करणाऱ्या नागपूरकरांना जाेरदार पावसाची प्रतीक्षा हाेती. या माेसमात शनिवारी पहिल्यांदा नागपूरकरांनी पावसाचा जाेर अनुभवला पण ताे त्रासदायक ठरला. पहाटे ५ वाजतापासून विजांच्या थयथयाटासह पावसाला सुरुवात झाली. ही एकसारखी मुसळधार दुपारी १२ वाजतापर्यंत सतत सुरू हाेती. या अतिवृष्टीमुळे नागपूरकरांची दाणादाण उडाली. उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम सर्व भागातील शेकडाे वस्त्या जलमय झाल्या आहेत.

वाठाेडा, पारडी, चिखली, एचबी टाउन, वर्धमाननगर, केसरमातानगर, बाबा फरीदनगर, गायत्रीनगर, आराधनानगर, स्वावलंबीनगर, दीनदयालनगर, रविंद्रनगर, डिप्टी सिग्नल, स्वामीनारायण मंदिर, कळमना, वाठाेडा ले-आउट, गाेपालकृष्णनगर, विद्यानगर, संकल्पनगर, शेषनगर या परिसरातील बहुतेक वस्त्या जलमय हाेत्या. कळमना नाल्याजवळची वस्ती पाण्याने वेढली हाेती. दक्षिणेकडे मानेवाडा, बेसा राेड, घाेगली राेड, हुडकेश्वर राेड या भागातील वस्त्या पाण्याने वेढल्या हाेत्या व अनेक वस्त्यांचा मुख्य शहराशी संपर्क तुटला हाेता. लाेकांची घरे अक्षरश: पाण्यात बुडाली हाेती. या भागातील शेकडाे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. शताब्दी चाैक ते मनीषनगर रस्ता जलमय झाल्याने मार्गावर वाहतूक बंद झाली. नरेंद्रनगर, श्रीकृष्णनगर, पडाेळे चाैक, हिवरी ले-आउट, देशपांडे ले-आउट, जयताळा, शंकरनगर, शिक्षक काॅलनी, काशीनगर, बालाजीनगर, भाकरे ले-आउट, उत्तर नागपुरात वैशालीनगर, इंदाेरा, दीक्षितनगर, केजीएन साेसायटी, फ्रेन्ड्सकाॅलनी या भागातील असंख्य वस्त्या जलमय झाल्या हाेत्या.

शहरातील नाल्यावरील सर्व पूलावरून पाणी वाहत हाेते, तर अंडरपास पाण्याने भरले हाेते. शहरालगतच्या बहुतेक वस्त्या पाण्यात बुडाल्या. शेकडाे लाेकांच्या घरात पाणी जमा झाले असून अन्नधान्य, कपडेलत्ते, फर्निचर असे सर्व काही पाण्यावर तरंगताना दिसत आहे. २३ सप्टेंबर २०२३ राेजी नागपूरकरांनी पूर अनुभवला पण त्याची व्याप्ती काही भागापुरती हाेती. मात्र शनिवारी शहरातील सर्वच भागात पूरसदृश्य स्थितीचा फटका बसला.

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाने मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला हाेता. शनिवारी पहाटेपासून अतिवृष्टी सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा नागरिकांना अलर्ट जारी केला. अतिवृष्टीची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. सकाळी शाळेसाठी मुलांची तयारी करणाऱ्या पालकांना यामुळे दिलासा मिळाला.

अनेक वस्त्यांचा वीज पुरवठा बंद
विजांच्या कडकडाटासह वादळी व मुसळधार पावसामुळे शहरातील शेकडाे वस्त्यांचा वीज पुरवठा बंद पडला. अनेक भागात विजेच्या तारांवर झाडे उन्मळून पडल्याचेही सांगण्यात येत आहे.


नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करीत आहेत. शाळांना सुटी देण्यात आली असून ज्या सखल भागात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कुही परिसरात काही रस्ते बंद झाले आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. गडचिरोलीतील काही भागांचा संपर्क तुटला आहे. विभागीय आयुक्त सातत्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. त्यांनाही सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री नागपूर

Web Title: Heavy fainfall in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.