नक्षलग्रस्त भागात गांजाची शेती; देशभर तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 05:53 AM2018-09-19T05:53:30+5:302018-09-19T05:53:56+5:30
पोलिसांच्या छाप्यात ४०० किलो गांजा जप्त
- नरेश डोंगरे
नागपूर : नक्षल प्रभावित राज्याच्या काही भागात गांजाची शेती पिकवून त्याची देशभर तस्करी करणाऱ्यांना नागपूर पोलिसांनी जोरदार फटका दिला आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अवघ्या २४ तासात ४०० किलो गांजा पकडल्यामुळे गांजा तस्करांच्या मध्यभारतातील नेटवर्कला जोरदार हादरा बसला आहे.
आोडिशा-छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या मलकनगिरी, जगदलपूर, सुकमा, दंतेवाडा, बस्तर तसेच वारंगल हा नक्षल्यांचा गड गांजा तस्करीचे प्रमुख केंद्र म्हणून मानला जातो. याच भागात गांजाची शेती पिकवली जाते. नागपूरमार्गे महाराष्टÑासह अन्य प्रांतात प्रारंभी वारंगल (आंध्रप्रदेश) मधून मोठ्या प्रमाणात गांजा यायचा. मात्र, दोन - तीन वर्षांपूर्वी आंध्र प्रदेश-तेलंगणा पोलीस कमालीचे आक्रमक झाले. नक्षली आणि गांजा तस्करांची मोठी धरपकड केल्याने त्यांच्या नेटवर्कला हादरा बसला आहे.
अशी होते हेराफेरी
घनदाट जंगलात गांजाचा माल साठवून ठेवला जातो. गांजा तस्कर हल्ली डस्टर, फोर्च्युनरसारखी आलिशान वाहने किंवा पॉश कार घेऊन तेथे पोहचतात. महामार्गावर त्यांना थांबवले जाते. त्यांच्याकडून गांजाची किंमत मोजून घेतल्यानंतर दुसरे काही जण गांजाची खेप घ्यायला आलेल्यांकडून त्यांचे वाहन ताब्यात घेतात. हे वाहन घनदाट जंगलात नेले जाते. तेथे संशय येऊ नये म्हणून कपड्यांचे, पुस्तकांचे, प्रिंटींग मटेरियल किंवा किंमती वस्तूंचे गठ्ठे वाटावे, अशा पद्धतीने आतमध्ये गांजा दडवून गठ्ठे बांधले जातात. त्यानंतर वाहन जंगलातून बाहेर आणून खेप घ्यायला आलेल्यांच्या हवाली केले जाते.
दुप्पट अडीचपट नफा
सध्या बाजारपेठेत गांजाचा (सरकारी) भाव १० हजार रुपये किलो आहे. मुख्य तस्करांकडून छोट्या तस्करांना तो ५ हजार रुपये किलोने मिळतो. दुसरे म्हणजे. २५ किलोच्या गठ्ठ्यात दोन ते तीन किलो गांजा जास्त मिळतो. गांजा तस्कर त्याच्या छोट्या छोट्या (५०, १०० ग्राम) पुड्या बनवून त्या ५० रुपयांपासून १५० ते २०० रुपयांना विकतात. त्यामुळे विकणारांकडे ५ हजारांच्या गांजाचे १० ते १५ हजार रुपये सहज जमा होतात.