चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळी वादळी पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:36 PM2018-02-13T13:36:56+5:302018-02-13T13:41:34+5:30
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यावर असलेली अवकाळी पावसाची गडद छाया सोमवारी खरी ठरली. सोमवारी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यावर असलेली अवकाळी पावसाची गडद छाया सोमवारी खरी ठरली. सोमवारी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. त्यामुळे अनेकांच्या घरांची छप्परे उडाली तर राजुरा व वरोरा तालुक्यात गारपीट झाल्याने शेकडो हेक्टरवरील रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. गारपीट व पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. सोमवारी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. सुमारे १ ते दीड तास मध्यम व हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. चंद्रपूर शहरात अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक मुख्य मार्गावरील नाल्या चोकअप झाल्या. तर वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने अनेक गावांचा व शहरांचा वीज पुरवठा रात्रभर खंडीत होता. या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील हरभरा, ज्वारी, मुंग, लाखोरी, तूर, जवस, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरांची छप्परे उडाल्याने अनेक कुटूंब उघड्यावर आली असून प्रशासनाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.