नागपुरात होळी-धुळवडीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:07 AM2019-03-19T00:07:19+5:302019-03-19T00:09:20+5:30
रंगाचा, उल्हासाचा उत्सव होळी आणि धुळवड शांततेत साजरा करा. त्याचा आनंद घ्या. कुणावर रंग लावण्यासाठी जबरदस्ती करू नका किंवा डीजे वाजवून धांगडधिंगा करू नका, अन्यथा तुम्हाला होळी-धुलिवंदन पोलीस ठाण्यात करावे लागेल, असा खणखणीत इशारा पोलिसांनी दिला आहे. होळी व धुलिवंदनाचा सण नागरिकांना शांततेत साजरा करता यावा यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्ताची योजना आखली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रंगाचा, उल्हासाचा उत्सव होळी आणि धुळवड शांततेत साजरा करा. त्याचा आनंद घ्या. कुणावर रंग लावण्यासाठी जबरदस्ती करू नका किंवा डीजे वाजवून धांगडधिंगा करू नका, अन्यथा तुम्हाला होळी-धुलिवंदन पोलीस ठाण्यात करावे लागेल, असा खणखणीत इशारा पोलिसांनी दिला आहे. होळी व धुलिवंदनाचा सण नागरिकांना शांततेत साजरा करता यावा यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्ताची योजना आखली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता प्रत्येक मुख्य चौकात पोलीस नाकाबंदी मोहीम राबविणार आहे. शाळकरी मुलामुलींचे वसतिगृह, महिलांच्या वसतिगृहाजवळ फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. या परिसरात पोलीस सलग गस्त करणार आहेत. वाहतुकीचे नियम मोडणारे, दारूच्या नशेत वाहन चालविणारे, बेदरकारपणे वाहन
चालविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे. डीजे वाजविण्यास परवानगी नाही. त्यामुळे कुणी डीजे वाजविताना दिसल्यास थेट गुन्हा दाखल करून डीजे सेट जप्त केला जाणार आहे. दारूच्या नशेत निष्काळजीपणे वाहन चालवून स्वत:च्या किंवा दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करू नका, असे भावनिक आवाहन आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे.
तिसरा डोळा ठेवणार लक्ष
शहरातील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तसेच सीओसीच्या माध्यमातून शहरातील वातावरणावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. हातभट्टी तसेच अवैध दारू विक्री करणारे, शस्त्रे बाळगणारे आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार तपासण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. शहर पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी तत्पर आहे. मात्र, नागरिकांनीही सणोत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी केले आहे.
अडीच हजार पोलीस तैनात
होळीच्या बंदोबस्तामध्ये ५ पोलीस उपायुक्त, १० सहायक आयुक्त, ४० पोलीस निरीक्षक, २०८ सहायक निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तसेच १ ८४३ पुरुष आणि १९० महिला पोलीस होळी-धुळवडीच्या बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहे. मदतीला राज्य राखीव पोलीस दलाची १ कंपनी, २ प्लाटून आणि १०० होमगार्ड राहणार आहेत. याव्यतिरिक्त क्यूआरटी, आरसीपी, विशेष शाखा आणि तसेच गुन्हे शाखेचा ताफाही सक्रिय राहणार आहे.