टेकडी गणेश मंदिरात निवडणुकीपूर्वी तापले राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:07 PM2019-12-13T23:07:20+5:302019-12-13T23:08:59+5:30
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नागपूरचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक १४ डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वी मंदिरात राजकारण चांगलेच तापले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नागपूरचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक १४ डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वी मंदिरात राजकारण चांगलेच तापले आहे. विश्वस्त मंडळाच्या वर्तमान पदाधिकाऱ्यांनी मंदिराच्या कारभारात प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावर मंडळाचे सचिव श्रीराम कुळकर्णी यांनी उत्तर देत विरोधकांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
मंडळातील माधव कोहळे, कोषाध्यक्ष संजय जोगळेकर, विश्वस्त निशिकांत सगदेव व लखीचंद ढोबळे यांनी पत्रपरिषद घेउन मंदिराच्या कारभारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. मंदिर परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढून निविदा न काढता नवीन कॅमेरे खरेदी करण्यात आले. मंदिरात स्टेनलेस स्टीलची रेलिंग लावण्यात आली, मात्र ६.५० लाख रुपयांचा माल निविदा न काढता खरेदी करण्यात आला. मोहगाव झिल्पी येथे दानरुपात मिळालेल्या ४.८५ एकर जमिनीवर निविदा काढून काम करण्याचा ठराव झाला असताना तसे न करता मंदिर विकासाचे काम सुरू करण्यात आल्याचे ढोबळे यांनी सांगितले. एकही सदस्य येथे चर्च करण्यास इच्छुक नसताना लाखो रुपये खर्च करण्यात आले. अशा विविध कामात तसेच टेकडी मंदिराच्या बांधकामातही लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पॅनलच्या या सदस्यांनी केला आहे. सचिव कुळकर्णी हे मंदिराच्या पैशातून नाहक विमान यात्रा करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मंडळाचे सचिव श्रीराम कुळकर्णी यांनी पत्रकाद्वारे या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. नवीन सीसीटीव्ही खरेदी, रेलिंग खरेदी सर्व सभासदांच्या देखरेखीत झाली आहे. मोहगाव झिल्पीचे काम सर्व सभासदांच्या संमतीनेच सुरू करण्यात आले असून हे स्थान पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंदिरातील दुसरी गणेश मूर्ती व महालक्ष्मीची मूर्ती सर्व सदस्यांच्या परवानगीनेच करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुठलाही भ्रष्टाचार न करता मंदिराची विकासकामे सुरू आहेत. मात्र विरोधक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशाप्रकारे आरोप करून गणेश मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी राजकारण करीत असल्याची टीका श्रीराम कुळकर्णी यांनी पत्रकातून केली आहे.