भाकित केलेले पाचही दिवस पावसाची हुलकावणी
By निशांत वानखेडे | Published: July 13, 2024 06:54 PM2024-07-13T18:54:47+5:302024-07-13T18:56:14+5:30
नागपूरकरांना लहरीपणाचा ‘उकाडा’ : यापुढेही मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज
नागपूर : हवामान विभागाने ९ ते १३ जुलैपर्यंत विदर्भात जाेरदार पावसाचे केलेले भाकित शेवटच्या दिवशीही फाेल ठरले. कुठे झाला, तर कुठे झालाच नाही आणि जिथे झाला, तिथेही सातत्य नव्हते. नागपूरकरांना तर पावसाच्या लहरीपणाने हैराण केलेल असून पावसाळ्यात उकाड्याने घामाच्या धारा निघत आहेत. आता पुन्हा वातावरणातील काही बदलामुळे पुढचे पाच दिवस मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
शनिवारी गाेंदिया ३६ मि.मी. आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी २३ मि.मी. व गाेंडपिपरी या भागात जाेराच्या सरी बरसल्या. गडचिराेली जिल्ह्याचा काही भाग ओला झाला. इतर सर्वत्र मात्र शुकशुकाट हाेता. नागपुरात तर लाेकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. आकाशात काळेभाेर ढग दाटून येतात. जाेरात पाऊस येईल, असे वाटते पण काही क्षणापुरती सर येते आणि निघूनही जाते. आर्द्रता व जमिनीची निघणारी वाफ यामुळे उष्णतेची तीव्रता अधिकच जाणवते. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पारा सरासरीच्या वर आहे. नागपूर सर्वाधिक ३३.६ अंश, चुंद्रपूर ३३.२ अंश, तर अकाेला व वर्धा ३२ अंशाच्या वर आहे.
आता नव्या अंदाजानुसार पूर्वाेत्तर आणि पूर्वेकडील राज्यात पावसाचा जाेर कमी झाला आहे, तर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यात पावसाचा जाेर वाढला आहे. एकमेकांशी निगडित वातावरणीय प्रणाल्यामुळे महाराष्ट्रात विशेषतः विदर्भातील ११ व सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, अश्या एकूण १६ जिल्ह्यात आजपासून पुढील ५ दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
परंतु मान्सूनच्या आगमनापासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होतो न होतो तोच पुन्हा कमकुवतेत जातो. आणि अश्या पुन्हा पुन्हा 'सक्रिय व कमकुवत' च्या हेलकाव्यातून 'कधी येथे तर कधी तेथे' अश्या मर्यादित एक - दोन चौरस किमी. परिसरात सायंकाळच्या ४ ते ८ प्रहरादरम्यानच 'उष्णता संवहनी' (कनवेक्टिव्ह) प्रक्रियेतून तयार झालेल्या 'क्यूमुलोनिंबस' प्रकारच्या ढगातून, वीजा व गडगडाटीसहित एखाद्या दिवशी एकाकी तीव्र पाऊस होतांना दिसत आहे. त्यामुळे पावसाच्या अपेक्षित समान वितरणाला धक्का पोहोचून पावसाळी दिवस कमी होत आहेत. पावसाचे आकडे दिसतात पण ताे पुरेशा प्रमाणात झाल्यासारखे वाटत नाही व सातत्यही नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.