विदर्भात पावसाचा हाहाकार; नागपूर, भंडारा, गाेंदियाला सर्वाधिक फटका, १० नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 10:41 AM2022-07-14T10:41:49+5:302022-07-14T10:48:45+5:30

शेकडो गावांचा संपर्क तुटला, हजारो नागरिकांचे स्थलांतर

heavy rain hits Vidarbha; Nagpur, Bhandara, Gondia were the worst affected, 10 deaths in last 24 hours | विदर्भात पावसाचा हाहाकार; नागपूर, भंडारा, गाेंदियाला सर्वाधिक फटका, १० नागरिकांचा बळी

विदर्भात पावसाचा हाहाकार; नागपूर, भंडारा, गाेंदियाला सर्वाधिक फटका, १० नागरिकांचा बळी

Next
ठळक मुद्देधरणांमध्ये पाणीसाठा वाढला, विसर्ग सुरूठिकठिकाणी मार्ग बंद; वाहतूक ठप्प, अनेक घरांची पडझड

नागपूर : विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नागपूरसह चंद्रपूर, गडचिराेली, भंडारा, गाेंदिया या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गाेंदियात दाेन शेतमजुरांसह दाेन तरुण पुरात वाहून गेले, तर भंडारा जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे नाल्याच्या पुरात एकजण बुडाला. याशिवाय नागपूर शहर आणि जिल्ह्यात चार अशा एकूण १० जणांचा बळी गेला.

नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरासह संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत. यातच लहान- मोठी धरणे भरू लागल्याने अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आली आहेत. त्यामुळे नदी- नाल्यांच्या काठावर असलेल्या तब्बल ३४८ गावांना धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नागपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी पेंच नदीवरील नवेगाव खैरी हे धरण १०० टक्के भरले आहे. धरणाचे पूर्ण १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सावनेर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यांतील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. रामटेक तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला. नागपूर शहरातील कळमना व नारा भागातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. जवळपास ५० घरांमध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले होते. शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील काही शाळांनी बुधवारी स्वत:हून सुटी जाहीर केली होती. नागपुरात दोन दिवस पुन्हा अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

भंडारा जिल्ह्यात सतत धो-धो बरसणाऱ्या पावसाने अतिवृष्टीची नोंद झाली असून, गत २४ तासांत तब्बल ९५.८ मिमी पाऊस झाला आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे बुधवारी एक मीटरने उघडले, तर मोहाडी तालुक्यात वीज कोसळून शेतकरी ठार झाल्याची घटना घडली. तर, वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पात्रातील नृसिंह मंदिरात १५ भाविक अडकले.

गाेंदिया जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी- नाले तुडुंब भरून वाहत असून, तिरोडा- गोंदिया मार्गावरील नाल्यावरील कच्चा पूल वाहून गेला, तर आमगाव-गोंदिया मार्गावरील सिंदीपारटोला नाल्यावरील पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या २४ तासांत ८३.३ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे ७० घरांची पडझड झाली, तर दोन जनावरांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात वीज कोसळून शेतकरी ठार झाल्याची घटना घडली.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि अहेरी तालुक्यात सलग पाचव्या दिवशी जोरदार पाऊस झाला. यासोबत गोदावरी, प्राणहिता आणि वैनगंगा नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील २,१०३ लोकांना संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. याशिवाय पुरात अडकलेल्या लोकांना एसडीआरएफ आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने बाहेर काढले जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातही दमदार पावसाने हजेरी लावली असून, वर्धा व पैनगंगा नदीला पूर आला आहे. राजुरा व कोरपना तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले असून, जिल्ह्यातील ८ धरणे फुल झाली आहेत. इरई धरणाचे सातही दरवाजे पाऊण इंचाने उघडले.

वर्धेत तीन गावांमध्ये शिरले पाणी

वर्धा/अमरावती/यवतमाळ : दमदार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील विश्रोळी (ता. चांदूर बाजार) येथील पूर्णा प्रकल्पाची पाच दारे सकाळी ११ वाजेपासून उघडली आहेत. मंगळवारी नांदगाव खंडेश्वर येथे लेंडी नाल्याला पूर गेला, तर मायवाडी (ता. मोर्शी) नजीक माडू नदीपात्रात अशोक लखुजी नांदने (५५, रा. असदपूर, ता. अचलपूर) यांचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात पवनूर येथील वनराई बंधारा मंगळवारी वाहून गेल्याने पवनूर, खानापूर आणि कामठी या गावात घरांमध्ये पाणी शिरले होते. यवतमाळ जिल्ह्यातील शंभरपैकी ५५ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. राळेगाव तालुक्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. महागाव तालुक्यातील शिरफुल्लीसह राहूर गावाला पुराचा वेढा आहे.

Web Title: heavy rain hits Vidarbha; Nagpur, Bhandara, Gondia were the worst affected, 10 deaths in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.