विदर्भात सर्वव्यापी पाऊस; भंडारा, गाोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात रात्री धुवांधार
By निशांत वानखेडे | Published: June 27, 2023 04:10 PM2023-06-27T16:10:10+5:302023-06-27T16:20:07+5:30
विदर्भाचा बॅकलॉग ५० टक्क्यांवर
नागपूर : चार दिवसांपूर्वी सक्रिय झालेल्या पावसाने आता जोर धरला आहे. नागपुरात जोरात नसला तरी संथपणे रिमझिम सुरू आहे. मात्र भंडारा, गाोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी रात्री धुवांधार बरसात झाली. भंडारा जिल्ह्याच्या साकोलीत १२ तासात तब्बल २०२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे या भागातील नदी, नाले, तलाव तुडूंब भरले आहेत.
नागपुरात रात्री १२ तासात १२.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात कुही तालुक्यात सर्वाधिक ४६.४ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाची रिपरिप मंगळवारी दिवसभरही चालली आहे. पावसाचा सर्वाधिक जोर भंडारा जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा कहर सुरू आहे. साकोली तालुक्याला पावसाने धो-धो धुतले. दुसरीकडे पवनी, लाखांदूर, लाखनी, तुमसर तालुक्यातही पावसाने थैमान घातले आहे.
भंडारानंतर लगतच्या गोंदिया जिल्ह्यालाही पावसाने चांगलेच झोडपले. अर्जुनी मोरगावला १५३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. याशिवाय गोरेगाव, आमगाव, देवरी, तिरोडा, सडकअर्जुनी तालुक्यातही पावसाने रात्रभर थैमान घातले. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरीमध्ये पावसाने धुवांधार बॅटिंग केली. रात्रभरात तब्बल ९१.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात १३६.७ मि.मी. पाऊस झाला. अकोला व अमरावतीतही पावसाची रिमझिम चालली आहे.