उमरेड परिसरात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:53+5:302021-07-02T04:07:53+5:30
उमरेड : मागील आठवडाभरापासून सतत हुलकावणी देणाऱ्या पावसाने अखेरीस गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास उमरेड परिसरात जोरदार हजेरी लावली. ...
उमरेड : मागील आठवडाभरापासून सतत हुलकावणी देणाऱ्या पावसाने अखेरीस गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास उमरेड परिसरात जोरदार हजेरी लावली. पावसाअभावी पिके संकटात असताना उशिराने का होईना शेतकऱ्यांच्या मदतीला पाऊस धावला. कृषी दिनाच्या पर्वावर निसर्गराजा पावला, अशा आनंददायी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहेत. बुधवारी रात्री काही मोजक्याच भागात तुरळक पाऊस झाला. यामुळे पिकांना संजीवनी मिळाली होती. असे असले तरी कालच्या पावसाच्या सरी समाधानकारक नव्हत्या. अशातच गुरुवारी सकाळपासूनच आभाळात काळेकुट्ट ढग जमा झाले होते. आजही पाऊस केवळ ढगातच थांबणार, असे वाटत असतानाच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे अळी आणि रोगांच्या संकटाचा मुकाबला करता येणार आहे. शिवाय, शेतशिवार पावसाअभावी कोरडे झाल्याने सर्वच शेतकऱ्यांची फवारणी रखडली होती. आता पावसाच्या आगमनाने फवारणीचेही काम सोपे होणार आहे. दुसरीकडे काहींच्या पेरणीच्या मोड झाल्यानंतर आज अनेकांनी पेरणी केली, यामुळे काहींच्या पेरण्या आज पुन्हा फसण्याची संभावना व्यक्त होत आहे. तूर्त आजच्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.