रात्रभर गडगडाटासह झाेडपले, दिवसा उघडीप; नागपूरसह भंडारा, गाेंदिया, यवतमाळात धुवांधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 11:30 AM2022-10-13T11:30:06+5:302022-10-13T11:30:28+5:30
१४ नंतरच मान्सून माघारी
नागपूर :विदर्भात नागपूरसह भंडारा, गाेंदिया, यवतमाळात मंगळवारी रात्री पावसाने धुवांधार बरसात केली. सायंकाळपासून सुरू झालेल्या रिपरिपने मध्यरात्रीनंतर वेग घेतला. विजा आणि ढगांच्या भीतीदायक गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. बुधवारी दिवसभर मात्र उघाड देत काहीसा दिलासा मिळाला. पुढच्या दाेन दिवसांतही पावसाला जाेर असेल, त्यानंतर मात्र पाऊस ओसरण्याचा अंदाज आहे. मात्र, दिवाळीदरम्यान हलका पाऊस हाेण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
बुधवारी सकाळपर्यंत भंडारा शहरात सर्वाधिक १३७ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे. नागपुरात तब्बल ४५.३ मि.मी. पावसाची नाेंद झाली. याशिवाय यवतमाळमध्ये ६० मि.मी. पाऊस झाला, तर गाेंदियामध्ये ५७.६ मि.मी. पावसाची नाेंद करण्यात आली. गाेंदिया जिल्ह्यात तिराेडा येथे ९४.५ मि.मी. पाऊस झाला, तर आमगाव, गाेरेगाव या शहरातही जावसाचा जाेर अधिक हाेता. नागपूर जिल्ह्यात माैदा तालुक्यात ८० मि.मी. पाऊस झाला, तर पारशिवनी तालुक्यातही जाेरदार पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात २४ तासांत २८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. अकाेल्यामध्ये सकाळपर्यंत १३.२ मि.मी. पाऊस झाला.
ऑक्टाेबर महिन्यात विदर्भात सरासरी ६४ मि.मी. पाऊस हाेताे. यावर्षी या महिन्यात ६० मि.मी. पावसाची नाेंद करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या महिन्यातही पाऊस सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे.
गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुरात जोरदार पावसाची शक्यता...
१३ ऑक्टाेबरलाही काही ठिकाणी जाेरात पाऊस हाेण्याची शक्यता आहे. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत पावसाचा जाेर अधिक असेल. १४ ला मात्र वेग मंदावलेला असेल. १५ पासून ढगाळ वातावरण राहणार असले तरी पाऊस हाेण्याची शक्यता दिसत नाही. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार १४ ऑक्टाेबरपासून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. दिवाळीदरम्यान मात्र किरकाेळ पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.