८ जुलैपर्यंत दमदार बरसणार मान्सून, विदर्भभर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2022 11:38 AM2022-07-05T11:38:01+5:302022-07-05T13:16:35+5:30
८ जुलैपर्यंत विदर्भात दमदार पाऊस येणार असल्याने पावसाची सरासरी या काळात बऱ्यापैकी पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
नागपूर : जून महिन्यात सरासरीपर्यंतही न पोहोचलेला पाऊस जुलैच्या प्रारंभीच चांगलाच बरसायला लागला आहे. वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, येत्या ८ जुलैपर्यंत विदर्भात दमदार पाऊस येणार असल्याने पावसाची सरासरी या काळात बऱ्यापैकी पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात रविवारच्या रात्रीपासूनच पावसाला प्रारंभ झाला आहे. नागपुरात सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत १० मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद गडचिरोलीमध्ये ६६ मिमी झाली आहे. त्या खालोखाल गोंदियात ५१ मिमी, ब्रह्मपुरी ३६ मिमी, चंद्रपूर ९ मिमी, यवतमाळ ४ मिमी, तसेच वर्धा व अमरावती येथे अनुक्रमे २ आणि १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
वेधशाळेच्या अंदजानुसार, छत्तीसगडमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नागपूरसह लगतच्या जिल्ह्याच्या आसमंतात ढग दाटले आहेत. ८ जुलैपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने पुढील चार दिवस पावसाचे राहणार आहेत.