सावनेर, कामठी, पारशिवनी तालुक्यात पावसासह गारपिटीचा तडाखा; पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 04:55 PM2022-01-11T16:55:17+5:302022-01-11T17:42:34+5:30
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले. याचा परिणाम पिकांवर होणार असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.
नागपूर : जिल्ह्यातील सावनेर कामठी आणि पारशिवनी तालुक्यात मंगळवारी (दि. ११) दुपारी १ वाजताच्या सुमारास मुसळधार अवकाळी पावसाला(untimely rain) सुरुवात झाली. त्यातच काही काही गावांमध्ये बाेर आणि आवळ्याच्या आकाराची गारपीटही(hailstorm) झाली. पावसाचा जाेर दुपारी २ वाजेपर्यंत कायम हाेता. त्यामुळे संत्रा व माेसंबीच्या बागांसह रबी व भाजीपाल्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
या गारपिटीमुळे सावनेर तालुक्यातील चनकापूर, सिल्लेवाडा, दहेगाव (रंगारी), वलनी, रोहणा आणि पिपळा (डाक बंगला) तसेच कन्हान नदीकाठची काही गावे, कामठी तालुक्यातील काेराडी, महादुला, नांदा तसेच पारशिवनी तालुक्यातील दहेगाव (जाेशी) सह परिसरातील गावांमधील संत्रा व माेसंबी तसेच कापणीला आलेली तूर, कपाशी, गहू, हरभरा, टाेमॅटाे यासह अन्य भाजीपाल्याच्या पिकांचे माेठे नुकसान झाले आहे.
'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे सध्या विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हवामान खात्याने रविवारपासून वादळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, पाऊस सुरुच आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे वातावरणातील गारठा वाढला असून, धुक्यामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव हाेण्याची शक्यता बळावली आहे. तर, पुढील तीन दिवस राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. शुक्रवारनंतर पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.