अखेर गरजलाही.. बरसलाही! १७ मि.मी. पावसाची नाेंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 11:04 AM2023-09-06T11:04:46+5:302023-09-06T11:06:43+5:30

जिल्ह्यातही जाेर कमी : २४ तास ऑरेंज अलर्ट

Heavy rainfall in Nagpur, 17 mm. of rain recorded; 24 hours orange alert | अखेर गरजलाही.. बरसलाही! १७ मि.मी. पावसाची नाेंद

अखेर गरजलाही.. बरसलाही! १७ मि.मी. पावसाची नाेंद

googlenewsNext

नागपूर : आकाशात काळेकुट्ट ढग आणि त्या ढगांचा भीतिदायक गडगडाट करीत पावसाची नागपुरात जाेरदार हजेरी लावली. या कालावधीत अवघ्या १७ मि.मी. पावसाची नागपूर शहरात नाेंद झाली. जिल्ह्यातही जाेर कमीच हाेता; परंतु या पावसामुळे उकाड्यात थाेडी कमतरता झाली, ते समाधानकारक ठरले.

दहा- बारा दिवस दडी मारलेला पाऊस दाेन दिवसांपासून पुन्हा विदर्भात हजर झाला. हिमालयाच्या पायथ्याशी रेंगाळणाऱ्या मान्सूनचा आस आता खाली सरकत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र दक्षिणेकडे सरकत असून, त्या प्रभावाने विदर्भासह महाराष्ट्रात पावसाळी स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट झेलणाऱ्या राज्यात आशा निर्माण झाली.

नागपुरात साेमवारी सकाळपर्यंत ४५ मि.मी. पाऊस झाला. दिवसा जाेर कमी हाेता व रात्रीही पावसाने उसंत घेतली. मंगळवारी सकाळपासून ऊन तापले हाेते. दुपारी १ वाजेदरम्यान हलक्या सरी बरसल्या. दुपारी ३ वाजेपासून वातावरण पूर्ण बदलले आणि आकाश काळ्या ढगांनी व्यापले हाेते. पाऊस राैद्ररूप धारण करेल, अशी स्थिती हाेती व विजांसह ढगांचे गर्जनही तसेच हाेते. त्यानुसार सुरुवातही धुवाधार बरसात झाली. मात्र, अर्ध्या-पाऊण तासाच्या सरीनंतर जाेर कमी झाला व काही काळ रिपरिप केल्यानंतर पाऊस शांत झाला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत १७ मि.मी. पावसाची नाेंद झाली. रात्री १० वाजेपर्यंत पाऊस थांबला हाेता.

दरम्यान, पावसाळी वातावरणामुळे पारा खाली उतरायला लागला असून, उकाड्यात थाेडी कमतरता आली आहे. मंगळवारी ३३.५ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली. रात्रीचे तापमान मात्र २.१ अंशाने वाढून २४.५ अंशावर गेले हाेते. विदर्भात चंद्रपूर व गडचिराेलीत हलक्या सरी बरसल्या. इतर जिल्ह्यांत शुकशुकाट हाेता. हवामान विभागाने येत्या २४ तासांत नागपूरसह भंडारा, गडचिराेली, वर्धा या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे.

सतर्कतेचा इशारा

  • हवामान विभागातर्फे ६ सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यात अति तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त करीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
  • धरणे ९५ टक्के भरली असून मुसळधार पावसामुळे १०० टक्के भरल्यास त्यांचे दरवाजे उघडले जाऊ शकतात.
  • मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. अशावेळी नागरिकांनी शक्यतो बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
  • घराबाहेर असल्यास झाडाखाली किंवा विद्युत संयंत्राजवळ उभे राहू नये, नदी, नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असेल तर त्यावरून जाण्याचा प्रयत्न करू नये. तरुणांनी नदी, तलावात उतरू नये व वेळेत सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: Heavy rainfall in Nagpur, 17 mm. of rain recorded; 24 hours orange alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.