नागपूरला पावसाने धो-धो धुतले; पूल-रस्ते पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 11:23 AM2022-07-08T11:23:07+5:302022-07-08T11:42:31+5:30

जोराच्या पावसामुळे मनपाच्या मान्सूनपूर्व उपाययोजनांची पोलखोल केली आहे. पावसाळी नाल्याची साफसफाई न झाल्याने पाणी साचण्याच्या घटनात भर पडली.

heavy rainfall In Nagpur with Lightning Strikes | नागपूरला पावसाने धो-धो धुतले; पूल-रस्ते पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत

नागपूरला पावसाने धो-धो धुतले; पूल-रस्ते पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत

googlenewsNext
ठळक मुद्देजागोजागी साचले पाणी; नरेंद्र नगर पुलाखाली अडकली वाहनेनागरिकांची तारांबळ : आयुक्तांकडून आढावा

नागपूर : नागपूरकरांना गुरुवारी दुपारनंतर बरसलेल्या दमदार पावसाने धो-धो धुतले. शहरात तीन तास जोरदार पाऊस झाल्याने जागोजागी पाणी साचले होते. सखल भागातील वस्त्यातही पाणी तुंबल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. नरेंद्र नगर पुलाखाली पाणी साचल्याने स्कूलबससह वाहने अडकली होती. अर्धवट असलेल्या सिमेंट रोडवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. जोराच्या पावसामुळे मनपाच्या मान्सूनपूर्व उपाययोजनांची पोलखोल केली आहे. पावसाळी नाल्याची साफसफाई न झाल्याने पाणी साचण्याच्या घटनात भर पडली.

नरेंद्र नगर पुलाखाली अडीच ते तीन फूट पाणी साचल्याने पुलाखाली स्कूलबससह अन्य वाहने अडकून पडली होती. मनिषनगर पुलाखालीही पाणी साचल्याने बराचवेळ वाहतूक विस्कळीत झाली. वर्धा रोडवरील साई मंदिर, शंकर नगर चौक, शंकरनगर मेट्रो स्टेशन, हिंगणा रोडवरील मेट्रो स्टेशनमध्ये पाणी तुंबले होते. अजनी रोड, विद्यापीठ लायब्ररीजवळ पाणी साचले होते. मानेवाडा रोड, पडोळे हॉस्पिटल चौक, कृपलानी चौक, सेंट्रल एव्हेन्यू रोड, मेडिकल चौक, वीटभट्टी चौक, कळमना, पारडी आदी भागात पाणी साचले होते. उमरेडवरील सर्वश्रीनगर, बेसा परिसरातील वस्त्यांत पाणी शिरले होते. बेसा येथील बँक ऑफ इंडियाच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले होते. गोपाल नगर येथील अरविंद शिंदे यांच्या घरात पाणी तुंबले होते. पावसाचा जोर कमी झाल्यावर साचलेले पाणी कमी झाले.

आयुक्तांनी सीओसीमधून निर्देश देत निराकरण केले

शहरातील जागोजागी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. अशा स्थितीत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपा मुख्यालयातील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर (सीओसी) मधून शहरातील परिस्थितीची पाहणी केली. शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आढावा घेतला. पाणी साचलेल्या भागात तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

३६०० सीसीटीव्हींतून शहरावर नजर

शहरात लावण्यात आलेल्या ३६०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाते. मात्र, उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीही संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. मुसळधार पाऊस आल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करता आयुक्त सीओसीमधून पाहणी करीत होते.

२४ तास नियंत्रण कक्ष

दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे मनपाचे नियंत्रण कक्ष, लाईव्ह सिटी ॲप आणि सोशल मीडियावरून मनपाकडे नागरिकांच्या पाणी साचण्याबाबत दिवसभर तक्रारी प्राप्त होत होत्या. मनपा मुख्यालयात अग्निशमन विभागाचे २४ तास नियंत्रण कक्ष सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी मनपा मुख्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये ०७१२ २५६७०२९, ०७१२ २५६७७७७ किंवा अग्निशमन केंद्रामध्ये ०७१२ २५४०२९९, ०७१२ २५४०१८८ यासह १०१ या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येईल. याशिवाय ७०३०९७२२०० या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारेसुद्धा आपली समस्या मांडावी, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

Read in English

Web Title: heavy rainfall In Nagpur with Lightning Strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.