पावसा, पावसा... काही वेळ थांब रे; गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 10:43 AM2022-07-18T10:43:30+5:302022-07-18T10:47:25+5:30
विदर्भात या आठवड्यात सरासरीपेक्षा १८० टक्के अधिक पाऊस पडला. नदी, नाल्यांना पूर आला, शेकडाे गावे बाधित झाली असून हजाराे नागरिक प्रभावित झाले यासह हजाराे हेक्टरमधील शेतीही प्रभावित झाली आहे.
नागपूर : गेल्या दहा-बारा दिवसात पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची झड कायम आहे. विदर्भात या आठवड्यात सरासरीपेक्षा १८० टक्के अधिक पाऊस पडला. नदी, नाल्यांना पूर आला, शेकडाे गावे बाधित झाली असून हजाराे नागरिक प्रभावित झाले आणि हजाराे हेक्टरमधील शेती प्रभावित झाली आहे; मात्र पावसाची संततधार कायम असून, पावसा, पावसा... आता काही वेळ थांब रे... अशी नागरिकांची भावना झाली आहे.
जुलैच्या या काळात सरासरी ७२.७ मि.मी पावसाची नाेंद हाेते पण यावेळी आठवड्यात २०३.३ मि.मी. पाऊस विदर्भात झाला. केवळ जूनचा बॅकलाॅग भरला नाही तर त्यापेक्षा कितीतरी अधिक पाऊस झाला आहे. जून पूर्ण हाेईपर्यंत विदर्भात केवळ १२७ मि.मी. पावसाची नाेंद झाली हाेती, जी ४१ टक्के कमी हाेती; मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात संथपणे सुरू झालेल्या पावसाने दुसऱ्या आठवड्यात उग्र रूप घेतले. कधी हलक्या सरी तर कधी मुसळधार असे सत्र सुरू झाले. सर्वच जिल्ह्यात ही धुवाधार सुरू हाेती. जून ते १७ जुलैपर्यंत सरासरी ३३९.२ मि.मी. पावसाची नाेंद हाेते; पण आठ-दहा दिवसांच्या पावसाने ४८२.४ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला, जाे ४२ टक्के अधिक आहे.
या पावसाने पूर्व विदर्भातील नागपूर आणि गडचिराेलीला अत्याधिक झाेडपले असून, दाेन्ही जिल्ह्यातील अनेक गावे आणि शेकडाे कुटुंब प्रभावित झाले आहेत. नागपूरला ६६ टक्के तर गडचिराेलीला ६३ टक्के अधिक पाऊस झाला. गडचिराेली ६३५ मि.मी. पेक्षा वर तर नागपुरात ४८९ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. याशिवाय चंद्रपूर ५९ टक्के, वर्धा ५६ टक्के, भंडारा ३८ टक्के तर गाेंदियात ३५ टक्के अधिक पाऊस झाला आहे.
पश्चिम विदर्भात सामान्य
दरम्यान, पश्चिम विदर्भातही जाेरदार पाऊस झाला असला तरी स्थिती सरासरीच्या आसपास आहे. अकाेल्यात केवळ एक टक्का अधिक नाेंद झाली. वाशिम ५ टक्के, अमरावती १२ टक्के, बुलढाणा १३ टक्के अधिक म्हणजे सरासरी पाऊस झाला. यवतमाळला मात्र ४० टक्के अधिक पावसाची नाेंद झाली आहे.
नदीपात्रातही काेसळधारा
गडचिराेली जिल्ह्यातून वाहणारी प्राणहिता नदी क्षेत्रात सरासरीपेक्षा ११७ टक्के अधिक म्हणजे ६९६.९ मि.मी. पाऊस झाला. वैनगंगा पात्रात ६२७ मि.मी. नाेंद झाली, जी ६२ टक्के अधिक आहे. इंद्रावती ५९९.६ मि.मी. (४७ टक्के) व वर्धा नदी क्षेत्रात ४४३ मि.मी. (४२ टक्के अधिक) पाऊस झाला आहे.
दिवसभर रिमझिम, गडचिराेलीत काेसळधार
गडचिराेलीत रविवारीही पावसाने थैमान घातले. शहरात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ६६ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील इतर भागातही जाेराचा पाऊस झाला. यानंतर गाेंदियात १९ मि.मी. पाऊस झाला. इतर जिल्ह्यात जाेरात नाही पण दिवसभर रिपरिप सुरू हाेती.
गडचिराेली जिल्ह्यात पुन्हा पूर परिस्थिती गंभीर
गाेदावरी नदी धाेक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे सिराेंचा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच पर्लकाेटा नदीचे पाणी भामरागड तालुकास्थळी शिरल्याने तालुक्यातील शेकडाे गावांचा संपर्क तुटला आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी, नाले ओसंडून वाहत असले तरी पुराचा माेठा फटका सिराेंचा व भामरागड तालुक्याला बसला आहे. सिराेंचा तालुक्यातील गाेदावरी नदीला पूर आल्याने २३१ कुटुंबातील ७७५ नागरिकांना चार दिवसांपूर्वीच सुरक्षितस्थळी हलविले आहे. पूर कायम असल्याने हे नागरिक अजूनही आश्रयस्थळीच थांबले आहेत. भामरागड तालुका व छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्लकाेटा नदीच्या पाण्याची पातळी वाढून पुराचे पाणी भामरागडात शिरले आहे. शेकडाे घरे, दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने माेठे नुकसान झाले आहे.