नागपुरात पावसाची दमदार हजेरी : २४.६ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 08:56 PM2020-06-03T20:56:34+5:302020-06-03T20:59:08+5:30
एकीकडे पश्चिम किनारपट्टीवर वादळाचा तडाखा बसला असताना नागपुरातदेखील पावसाने दमदार हजेरी लावली. पहाटे व त्यानंतर सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस आला. सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरलेलाच होता. ६ जूनपर्यंत शहरात पावसाळी वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे पश्चिम किनारपट्टीवर वादळाचा तडाखा बसला असताना नागपुरातदेखील पावसाने दमदार हजेरी लावली. पहाटे व त्यानंतर सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस आला. सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरलेलाच होता. ६ जूनपर्यंत शहरात पावसाळी वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळाची शहरवासीयांमध्ये चर्चा होतीच. पहाटे सव्वापाचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या गडगडाटामुळे लोकांची झोपदेखील उडाली. सुमारे सव्वा तास पाऊस सुरू होता. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारासदेखील पाऊस आला व अर्धा तास पाऊस सुरू होता. यामुळे सायंकाळी बाजारात खरेदीसाठी निघालेल्यांची तारांबळ उडाली. नागपुरात सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २२.८ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. तर त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत १.८ मिमी पावसाची नोंद झाली.
दरम्यान, ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे बुधवारीदेखील पारा घसरलेलाच होता. शहरात कमाल ३२.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान ९.८ अंशांनी कमी होते. तर किमान २१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार ६ जूनपर्यंत शहरात पाऊस येण्याची शक्यता आहे.
विदर्भातदेखील पाऊस
हवामान खात्यानुसार निसर्ग चक्रीवादळामुळे दक्षिण-पश्चिम मान्सूनचा वेग मंदावू शकतो. परंतु मान्सूनपूर्व हालचाली विदर्भासाठी अनुकूल दिसून येत आहेत. पुढील दोन दिवसांत नागपूरसह विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. गडचिरोली व वाशिम वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. अमरावती (४४.४ मिमी), गोंदिया (१९.४ मिमी), ब्रह्मपुरी (१८.८ मिमी), यवतमाळ (१५.१ मिमी), वर्धा (१३ मिमी), बुलडाणा (७ मिमी), अकोला (६.२ मिमी) पाऊस नोंदविण्यात आला.