जिल्ह्यात सर्वदूर वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:08 AM2021-05-19T04:08:40+5:302021-05-19T04:08:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल/काेंढाळी/नरखेड/कामठी/रामटेक/नगरधन/हिंगणा/पारशिवनी/सावनेर/गुमगाव : नागपूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी व सायंकाळी वादळासह अवकाळी पावसाने जाेरदार हजेरी लावली. या पावसामुळे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल/काेंढाळी/नरखेड/कामठी/रामटेक/नगरधन/हिंगणा/पारशिवनी/सावनेर/गुमगाव : नागपूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी व सायंकाळी वादळासह अवकाळी पावसाने जाेरदार हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, संत्रा, माेसंबी, आंबा या फळांसह भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही गावांमध्ये टीनपत्र्यांचे छत उडाले असून, काही ठिकाणी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला हाेता. शिवाय वीज काेसळून गुरे व बकऱ्यांचाही मृत्यू झाला.
काटाेल शहरासह तालुक्यातील वंडली, मसली व काेंढाळी परिसरात अवकाळी पावसाच्या जाेरदार सरी बरसल्या. काही भागात गारपीटही झाली. वादळ व विजांच्या कडकडाटामुळे भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले हाेते. वंडली गावातून पुराप्रमाणे पावसाचे पाणी ओसंडून वाहत हाेते. येथील काही घरावरील छताचे टीन पत्रे उडाली हाेती तर तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला हाेता. काेंढाळी (ता. काटाेल) व परिसरात दुपारी २ वाजतापासून वादळासह पावसाला सुरुवात झाली हाेती. वादळामुळे घरावरील छप्पर उडाल्याने अनेकांना नुकसान सहन करावे लागले. पाऊस व वादळाचा जाेर एक तास कायम हाेता. यात काेंढाळी येथील विशाल जाधव, तुळसाबाई घुगरे, सीताराम पिटेकर यांच्या घरावरील छप्पर उडाल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले. पंचायत समितीच्या सदस्य लता प्रमोद धारपुरे यांनी या नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, वीजपुरवठाही खंडित झाला हाेता.
नरखेड तालुक्यातील भिष्णूर, तीनखेडा, थूगाव (निपाणी) परिसरात वादळासह पाऊस झाला. कामठी शहरासह परिसरातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाने जाेरदार हजेरी लावली. वादळ व विजांच्या कडकडाटामुळे मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. शिवाय, शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले हाेते. तालुक्यात सध्या फारशी पिके नसल्याने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले नाही. मात्र, भाजीपाल्यासह फुलांच्या पिकांना पावसाचा जबर फटका बसल्याची माहिती नेरी येथील डुमदेव नाटकर या शेतकऱ्याने दिली. जिल्ह्यातील रामटेक, नगरधन, हिंगणा, पारशिवनी व सावनेर तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली.
...
वीज काेसळून एकाचा मृत्यू
वाहाब राज मोहम्मद शेटे (६३, रा. गुमगाव, ता. हिंगणा) हे मंगळवारी बकऱ्या चारण्यासाठी नजीकच्या काेतेवाडा (ता. हिंगणा) शिवारात गेले हाेते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घराकडे परत येत असताना पावसाला सुरुवात झाल्याने त्यांनी झाडाखाली आश्रय घेतला. त्यातच जाेरात कडाडलेली वीज झाडावर काेसळल्याने ते हाेरपळून गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठून त्यांना लगेच नजीकच्या शासकीय दवाखान्यात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले. वीज काेसळून गुरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही जिल्ह्यातील काही भागात घडल्या. झाडावर वीज काेसळल्याने एक गाय व एक बैल अशा दाेन गुरांचा मृत्यू झाल्याची घटना नरखेड तालुक्यातील भिष्णूर शिवारात घडली.
...
संत्रा, माेसंबीला फटका
या अवकाळी पावसामुळे काटाेल, नरखेड, सावनेर व हिंगणा तालुक्यातील संत्र्याच्या अंबियाबहाराचे नुकसान झाले असून, या पावसामुळे मृगबहाराची फूट हाेण्यास अडचणी निर्माण हाेणार असल्याचे संत्रा उत्पादकांनी सांगितले. वादळामुळे काही भागातील माेसंबी व आंब्याची फळे गळाली आहेत. वादळामुळे काही शेतातील संत्रा व माेसंबीची झाडे उन्मळून पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही गावांमधील ग्रामसेवकांनी या वादळी पावसाची माहिती काटाेल पंचायत समिती प्रशासनाला दिली. खंडविकास अधिकारी संजय पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी लगेच वंडली व परिसरातील काही गावांना भेटी देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणीही केली. त्यांनी अन्य गावांमधील नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले.