जाेरदार पावसामुळे नागपूर-भाेपाळ महामार्गावर वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2022 08:35 PM2022-07-05T20:35:19+5:302022-07-05T20:36:40+5:30
Nagpur News जाेरदार पावसामुळे नागपूर-भाेपाळ महामार्गावर वाहतूक ठप्प पडली. अनेक वाहनांच्या रांगा लागल्या असून, नागरिकांना अनेक तास ताटकळत राहावे लागले आहे.
बैतूल : मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील अनेक भागात साेमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून, वाहतुकीचा खाेळंबा निर्माण झाला आहे. जाेरदार पावसामुळे नागपूर-भाेपाळ महामार्गावर वाहतूक ठप्प पडली. अनेक वाहनांच्या रांगा लागल्या असून, नागरिकांना अनेक तास ताटकळत राहावे लागले आहे.
पाेलीस सूत्रांच्या माहितीनुसार जाेरदार पावसामुळे शहापूर पाेलीस स्टेशनअंतर्गत नागपूर-भाेपाळ महामार्गावर असलेली भाैरा नदी ओसंडून वाहत आहे. नदीत पाणी भरल्याने सकाळी ८ वाजतापासून वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे महामार्गाच्या दाेन्ही बाजूला काही किलाेमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान पावसाने उघडीप दिल्यानंतर वाहतूक सुरू हाेऊ शकली. शहापूर पाेलीस स्टेशनच्या सीमेवर नर्मदापूरम जिल्ह्याच्या केसला पाेलीस स्टेशनअंतर्गत सुखतवा येथे असलेल्या पुलावरून तीन फुटापर्यंत पाणी वाहत असल्याने सकाळी ९ वाजताच्या दरम्यान नागपूर-भाेपाळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.
सातपुडा जलविद्युत केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाचे दहा दरवाजे एकएक फूट उघडण्यात आले व तवा नदीत पाणी साेडल्याने नदीचे पात्र ओसंडून वाहू लागले आहे. हवामान विभागाच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील २४ तासात आज सकाळी ८ वाजतापर्यंत घाेडाडाेगरी येथे १११ मिमी, आमलामध्ये ४१ मिमी, बैतूलमध्ये ३०.५ मिमी, चिचाेलीमध्ये २९ मिमी, शाहापूरला १०५ मिमी, मुलताईमध्ये २९ मिमी, प्रभातपट्टनमध्ये ३७ मिमी, भैसंदेही येथे ३४ मिमी, आठनेर येथे २७ मिमी आणि भीमपूर येथे १९ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.