अतिवृष्टीमुळे भाज्या कडाडल्या; कांदे, टोमॅटो ६० रुपये, कोथिंबीर १२० रुपये किलो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 07:30 AM2021-10-19T07:30:00+5:302021-10-19T07:30:02+5:30
Nagpur News अतिवृष्टीमुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक कमी झाल्याने भाव आकाशाला भिडले आहेत.
नागपूर : अतिवृष्टीमुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक कमी झाल्याने भाव आकाशाला भिडले आहेत. सध्या स्थानिकांकडून थोडीफार आवक सुरू झाल्याने काही भाज्यांचे भाव कमी झाले आहेत. पण किरकोळमध्ये कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची ६० रुपये आणि कोथिंबीर १२० रुपये किलोवर गेले आहे. दिवाळीनंतर स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक वाढल्यानंतर भाव कमी होणार असल्याचे ठोक विक्रेत्यांनी सांगितले.
स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांसह टोमॅटो बेंगळुरू, हिरवी मिरची बुलडाणा व मौदा आणि कोथिंबीर नाशिक, नांदेड, उमरानाला येथून विक्रीला येत आहे. सिमला मिरचीची आवक भिलाई, रायपूर येथून आहे. फूलकोबीचे भाव ६० रुपये आहेत. पालक ७० ते ८० आणि मेथीचे भाव १२० रुपयांवर पोहोचले आहेत. ८० रुपये किलोचे वांगे सध्या ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.
ग्राहक जास्त दराच्या भाज्यांची खरेदी करीत नसल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. कॉटन मार्केट उपबाजारात सध्या ४५ ते ५० गाड्यांची आवक असल्याची माहिती महात्मा फुले सब्जी व फ्रूट मार्केट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.
किरकोळमध्ये कांदे @ ५०
ठोकमध्ये ४२ रुपये आणि किरकोळमध्ये ६० रुपयांवर गेलेले कांंद्याचे भाव सध्या कमी झाले असून, ठोकमध्ये दजार्नुसार ३० ते ३५ रुपये आणि किरकोळमध्ये ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. त्यानंतरही गृहिणींसाठी कांदे महागच आहेत. कळमना ठोक बाजारात दररोज २५ ट्रक कांद्याचे ट्रक येत आहेत. उन्हाळ्यात साठविलेल्या जुन्या कांद्याची आवक नाशिक आणि अहमदनगर तर थोडाफार जळगाव जिल्ह्यातून आणि नवीन कांदे कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्य व सातारा जिल्ह्यातून सुरू आहे.
नाशिक व धुळे जिल्ह्यातून नवीन कांद्याची आवक दिवाळीनंतर होणार आहे. दसऱ्यानंतर धुळे जिल्ह्यातून येणाऱ्या कांद्याला उशीर झाला आहे. पांढऱ्या कांद्याचे दोन ट्रक सोलापूर व अमरावती जिल्ह्यातून विक्रीला येत आहेत. अतिवृष्टीमुळे बराच कांदा शेतातच खराब झाला आहे. दोन आठवड्यापासून भाव वाढले आहेत. सध्या आवकीचा अंदाज बांधणे कठीण असून, आवकीनंतरच भाव कमी-जास्त होण्याची शक्यता कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी व्यक्त केली.
कळमन्यात दजार्नुसार बटाट्याचे भाव १० ते १५ रुपये असून, किरकोळमध्ये भाव ३० रुपयांवर गेले आहेत. आठवड्यात सरासरी १८ ते २० ट्रकची आवक आहे. काही आठवड्यांपूर्वी कळमन्यात ९० ते १०० रुपयांवर गेलेले लसणाचे भाव सध्या ७० ते ८० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मात्र, किरकोळमध्ये १४० ते १५० रुपयांपर्यंत भाव आहेत. दररोज दोन ट्रकची आवक राजस्थान (कोटा) आणि मध्य प्रदेश (मनसोर, जावरा) येथून आहे.