जिल्ह्याला वादळी पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:08 AM2021-05-17T04:08:16+5:302021-05-17T04:08:16+5:30
सावनेर/काटाेल/हिंगणा/कळमेश्वर/काेेंढाळी/बुटीबाेरी/जलालखेडा/मेंढला : जिल्ह्यातील काही भागात रविवारी (दि. १६) दुपारी, तर काही भागात सायंकाळी वादळासह अवकाळी पावसाच्या सरी काेसळल्या. वादळामुळे ...
सावनेर/काटाेल/हिंगणा/कळमेश्वर/काेेंढाळी/बुटीबाेरी/जलालखेडा/मेंढला : जिल्ह्यातील काही भागात रविवारी (दि. १६) दुपारी, तर काही भागात सायंकाळी वादळासह अवकाळी पावसाच्या सरी काेसळल्या. वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक खाेळंबली हाेती, तर विजेच्या तारा तुटल्याने काही गावांचा वीजपुरवठाही खंडित झाला हाेता. शिवाय, या पावसामुळे शेतीची खरीपपूर्व मशागतीची कामेही प्रभावित झाली.
नरखेड तालुक्यातील जलालखेडा व मेंढला परिसरात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वादळासह पावसाला सुरुवात झाली. वादळामुळे जलालखेडा-माेवाड मार्गावरील काॅटन जीनजवळ बाभळीचे झाड उन्मळून पडले हाेते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक २० ते २५ मिनिटे खाेळंबली हाेती. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून ते झाड जेसीबीच्या मदतीने बाजूला केले. ते झाड अंदाजे ३० वर्षांचे हाेते, अशी माहिती या भागातील शेतकऱ्यांनी दिली.
जलालखेडा परिसरासाेबतच नरखेड तालुक्यातील मेंढला, वाढोणा, रामठी, सिंजर, दावसा, थडीपवनी याही भागांत वादळासह पाऊस बरसला. साेबतच सावनेर शहरासह तालुक्यातील काही भागात विजेच्या कडकडाटांसह वादळी पाऊस काेसळला. काटाेल, हिंगणा, कळमेश्वर शहर व तालुक्यात तसेच काेंढाळी (ता. काटाेल), बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटांमुळे मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. जिल्ह्यात वीज काेसळून प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही.
...
वीजपुरवठा खंडित
जलालखेडा-माेवाड मार्गावर झाड काेसळल्याने येथील विजेच्या तारा तुटल्याने या भागातील काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला हाेता. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून वेळीच तारांमधील वीजप्रवाह बंद केला. वादळामुळे कळमेश्वर व काेंढाळी परिसरातील काही गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला हाेता. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेत खंडित वीजपुरवठा सुरळीत केला.
....
फळे व भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान
या पावसामुळे सावनेर, काटाेल, हिंगणा, कळमेश्वर, काेेंढाळी (ता. काटाेल), बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण), जलालखेडा (ता. नरखेड), मेंढला (ता. नरखेड) परिसरातील अंबिया बहाराचा संत्रा, माेसंबी, आंबा व भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान झाले. काही भागात पावसामुळे जनावरांचे वैरण भिजल्याने ते खराब हाेण्याची शक्यता निर्माण झाली असून, नांगरणी केलेली जमीन पुरेसी तापणार नसल्याने त्याचा खरीप पिकांवर परिणाम हाेण्याची शक्यता बळावली आहे.
...
===Photopath===
160521\img-20210516-wa0184.jpg
===Caption===
फोटो ओळी. जलालखेडा ते मोवाड मार्गावर जूनेजा कॉटन जिन जवळ कोसलेले 30 वर्ष जुने बाबळीचे झाड.