धो-धो बरसला... काटोल, नरखेड, कळमेश्वरात मुसळधार; ३७.२ मि.मी. पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:08 AM2023-07-22T11:08:46+5:302023-07-22T11:09:10+5:30

रामटेकात रोवण्यांना वेग

Heavy rains in Katol, Narkhed, Kalameshwar of Nagpur dist; 37.2 mm. Record of rain | धो-धो बरसला... काटोल, नरखेड, कळमेश्वरात मुसळधार; ३७.२ मि.मी. पावसाची नोंद

धो-धो बरसला... काटोल, नरखेड, कळमेश्वरात मुसळधार; ३७.२ मि.मी. पावसाची नोंद

googlenewsNext

नागपूर : शुक्रवारी सकाळपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस कोसळला. शहराबरोबरच काटोल, नरखेड, कळमेश्वरात दुपारच्या सुमारास मुसळधार बरसला. हवामान खात्याने ३७.२ मि.मी. पावसाची नोंद केली. या पावसामुळे रामटेकमध्ये रोवण्यांना वेग आला आहे. काटोल, कळमेश्वर, नरखेडातील शेतकऱ्यांनी शेतीची कामे हाती घेतली आहेत.

सकाळचा पाऊस ऐन शाळेच्या वेळेवर बरसला. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ झाली. अनेक विद्यार्थ्यांनी पावसामुळे शाळेला दांडीही मारली. तर शाळेत गेलेले विद्यार्थी शाळेतून परततानाही जोरदार पाऊस बरसला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ओडिशाच्या सीमावर्ती भागासोबतच उत्तर आंध्र प्रदेश व पश्चिम मध्य बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याबरोबर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. ही स्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे. त्यामुळे हवामान खात्याने २५ जुलैपर्यंत यलो अलर्ट दिला आहे.

- झाडे कोसळली, वाहतुकीचा खोळंबा

शहरात दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खोलगट भागातील वस्त्यांमध्ये पाणी जमा झाले होते. तर काही चौकांमध्ये खोलगट भाग असल्याने पाणी साचले होते. नाले पावसामुळे चांगलेच भरले होते. पण, नाल्याचे पाणी वस्त्यांमध्ये शिरल्याच्या कुठल्याही तक्रारी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे नाहीत. काही झोपडपट्ट्यांमधील रस्ते पाण्याखाली येऊन घरांमध्ये पाणी शिरण्याची स्थिती आली होती. मुसळधार पावसामुळे शहरातील धंतोली, व्हीसीए व कुकरेजानगर येथे झाड पडल्याच्या तक्रारी आपत्ती व्यवस्थापनाकडे आल्या. धंतोलीत मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

- नागपुरात ३४४.८ मि.मी. पाऊस

नागपुरात गेल्या ५१ दिवसांत ३४४.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जी सरासरीच्या ८ टक्के कमी आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून विदर्भात मान्सून सक्रिय झाला आहे. विदर्भात आतापर्यंत ३७६.२ मि.मी. पाऊस झाला आहे. जो सरासरीच्या २ टक्के कमी आहे. तर जून ते २१ जुलैदरम्यान विदर्भात सरासरी ३८२.६ मि.मी. पाऊस होतो.

Web Title: Heavy rains in Katol, Narkhed, Kalameshwar of Nagpur dist; 37.2 mm. Record of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.