जिल्ह्यात पावसाचे धुमशान, काटाेलात ६ टन माेसंबी गेली वाहून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 10:40 AM2023-09-22T10:40:51+5:302023-09-22T10:40:51+5:30
पुढचे ४८ तास पावसाळी
नागपूर : चार दिवसानंतर बुधवारी परतलेल्या पावसाने दुसऱ्या दिवशी आपला जाेर आणखी वाढविला. गुरुवारी शहरासह जिल्ह्यात बहुतेक भागात पावसाने जाेरदार हजेरी लावली. नागपूर शहरात सकाळपासून रिमझिम सुरू हाेती व दुपारनंतर जाेरदार सरी बरसल्या. शहरात २४ तासात २१.३ मि.मी. पावसाची नाेंद झाली.
गुरुवारी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे काटाेल तालुक्याच्या लाडगाव-परसाेडी शिवारातील नाल्याला पूर आला. या नाल्यालगत लाडगाव निवासी लाेकेश सुभाष नासरे यांची माेसंबीची बाग आहे. त्यांनी बाजारात विक्रीला नेण्यासाठी माेसंबीची फळे ताेडली हाेती. शेतात वाहन जात नसल्याने त्यांनी अंदाजे तीन टन माेसंबी शेतात ठेवली तर सहा टन माेसंबी रस्त्यालगतच्या माेकळ्या जागेवर ठेवली हाेती. अशात गुरुवारी झालेल्या जाेरदार पावसामुळे नाल्याला पूर आला व लगत ठेवलेली सर्वच्या सर्व माेसंबी वाहून गेली. शेतातील माेसंबीही पाणी साचल्याने बुडाली. त्यामुळे त्यांना लाखाेंचे नुकसान सहन करावे लागले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काटाेलसह रामटेक, बुटीबाेरी, कुही तालुक्यातही गुरुवारी पावसाचा जाेर वाढलेला दिसून आला. चार दिवस उघडीप दिल्याने उकाड्यामुळे नागरिकांचे हाल झाले हाेते. पावसाळी वातावरणामुळे तापमान २४ तासात ३.६ अंशाने खाली घसरले असून, उकाड्यापासून सुटका मिळाली. हवामान विभागाने पुढच्या २४ तासात जाेरदार ते अतिजाेरदार पावसाचा अंदाज व्यक्त करीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.