नागपुरात पावसाचे तांडव, रस्त्यांवर पूरपरिस्थिती सिताबर्डी, पंचशील चौक ‘ब्लॉक’
By योगेश पांडे | Published: September 23, 2023 10:30 AM2023-09-23T10:30:50+5:302023-09-23T10:47:40+5:30
दुकानांमध्ये शिरले पाणी : वाहतूक पूर्णपणे ठप्प
नागपूर : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचले होते. सखल भागांत तर अतिशय कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ सखल भागच नव्हे तर अगदी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सिताबर्डी, पंचशील चौक, रामदासपेठ यांना सर्वात मोठा फटका बसला. संपूर्णभाग जलमय झाला होता.
झाशी राणी चौक, मुंजे चौक, महाराजबाग रस्ता, पंचशील चौक विदर्भ साहित्य संघासमोरील रस्तावर केवळ पाणीच पाणी दिसून येत होते. सिताबर्डी हे शहर बससेवेचे ‘जंक्शन’ मानण्यात येते. परंतु दुचाकी वाहने तर सोडाच, परंतु बसदेखील जाणे शक्य नसल्यामुळे नागपुर वाहतूक वाजेपर्यंत ‘ब्लॉक’ झाली होती. यामुळे चाकरमान्यांचे, तसेच विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. सिताबर्डी तसेच आसपासच्या परिसरात पाण्यामुळे ‘जाम’ लागल्याचे दिसून आले.
नागपूर-शुक्रवारी मध्ये रात्री नंतर झालेल्या पावसामुळे नागपूर आज जागोजागी पाणी भरले आहे. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी भरले आहे. अनेक शाळांमध्ये देखील पाणी भरले असून जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. (व्हिडिओ- योगेश पांडे, लोकमत) pic.twitter.com/oJ9YKGU2Jx
— Lokmat (@lokmat) September 23, 2023
दुकानांत पाणी, कोट्यवधींचे नुकसान
सिताबर्डी भागात मोठ्या प्रमाणात दुकाने आहे. सिताबर्डी मुख्य बाजार, मोरभवन, धंतोली, पंचशील चौक येथील दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. पाणी शिरल्याची माहिती कळताच दुकानदार लगबगीने दुकानांकडे धावून येत होते व हाती लागेल तेवढा माल हटविण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. झाशी राणी चौक, मोरभवनजवळील दुकानांचे तर सर्वाधिक नुकसान झाले. अ़नेक दुकानांमधील जोडे, चपला, छत्र्या अक्षरश: पाण्यात तरंगत होते. याशिवाय या भागात फर्निचरचीदेखील दुकाने आहेत. येथेदेखील पाणी शिरले होते.
वाहनांच्या रांगा
रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने अडकून पडली होती. पाणी शिरल्यामुळे वाहने सुरूच होत नसल्याने वाहनचालकांची अडचण झाली. अनेक रस्त्यांवर वाहनांची रांग लागलेली दिसून आली. दरम्यान, रस्त्यांवरुन चालणे शक्य नसल्याने नागरिकांना रस्ता दुभाजकावरुनच चालावे लागले. अनेक ठिकाणी दुभाजकदेखील पाण्यातच होते.