नागपुरात मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी जाहीर; शहरात सखल भागात साचलं पाणी
By योगेश पांडे | Published: July 20, 2024 09:30 AM2024-07-20T09:30:13+5:302024-07-20T09:30:32+5:30
नरेंद्र नगर, भांडेवाडी,शिवशक्ती नगर, पिवळी नदी, मानकापूर येथील वस्त्यांचा समावेश आहे. काही घरांतदेखील पाणी शिरले आहे
नागपूर - रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात अनेक सखल भागात पाणी जमायला लागले आहे. पावसाचा जोर पाहता शाळा- महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता व पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.
रात्रीपासूनच शहरात पावसाला सुरुवात झाली. ४ वाजताच्या सुमारास पावसाची तीव्रता वाढली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. त्यात नरेंद्र नगर, भांडेवाडी,शिवशक्ती नगर, पिवळी नदी, मानकापूर येथील वस्त्यांचा समावेश आहे. काही घरांतदेखील पाणी शिरले आहे. काही तासातच नागपुरात ९१.३ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी ११.३० पर्यंत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
प्रशासनाच्या संथपणाचा विद्यार्थ्यांना फटका
दरम्यान, शहरातील अनेक शाळांकडून प्रशासनाकडून सुटीसंदर्भातील निर्देशांची प्रतीक्षा होती. विद्यार्थी सकाळी साडेसात वाजता शाळांसाठी निघतात. तोपर्यंत कुठलीही अधिकृत सूचना न पोहोचल्याने विद्यार्थी शाळांकडे निघाले. त्यानंतर प्रशासनाकडून सुटीचे निर्देश जारी करण्यात आले. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. पालकांनी प्रशासनाच्या संथपणावर रोष व्यक्त केला. काही शाळांनीच समयसूचकता दाखवत अगोदरच पालकांना एसएमएस पाठवत सुटी असल्याचे कळविले.