मुसळधार पावसाने नागपुरात दाणादाण; बाभूळखेड्यात जीर्ण घर कोसळून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 12:54 PM2022-07-15T12:54:40+5:302022-07-15T12:59:05+5:30
गुरुवारी दुपारपर्यंत नागपुरात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर रस्ते जलमय झाले. काही वेळ तर अंधारल्यागत स्थिती होती. रात्री उशिरापर्यं पाऊस सुरूच होता.
नागपूर : पावसाची झड सातव्या दिवशीही कायम असून गुरुवारी पावसाने नागपूरकरांना पुन्हा धाेधाे धुतले. सकाळपासून शांततेत रिपरिप करणाऱ्या पावसाने दुपारी उग्र रूप धारण केले. तब्बल दाेन तास काेसळधार सुरू हाेती. पावसाच्या जाेरदार तडाख्यामुळे शहरातील रस्त्यावर पुरासारखे पाणी वाहत हाेते, तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची अक्षरश: दाणादाण उडाली. दरम्यान, जिल्ह्यात पारशिवनी वगळता इतर तालुक्यात थाेडी उसंत घेतली. तर, नवीन बाभूळखेड्यात जीर्ण घर कोसळून एकाचा मृत्यू झाला.
दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे नवीन बाभूळखेडा, तीन मुंडी झेंडी चौक येथील जीर्ण घर कोसळले, त्यात एकाचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. किशोर केसलवार (३९) असे मृताचे नाव आहे. तर, जखमीचे नाव त्रिशेली केसलवार (२७) आहे. प्राप्त माहितीनुसार, केसलवार कुटुंब आपल्या दोन मुलांसह मागील वर्षांपासून विद्या रंगारी यांच्या या घरात भाड्याने राहत होते. हे घर जीर्ण अवस्थेत होते. मनपाचे अधिकारी या भागात फिरकत नसल्याने त्यांच्याकडून कोणतीही नोटीस बजावण्यात आली नव्हती. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कौलारू असलेले हे घर गुरुवारी रात्री १० च्या सुमारास अचानक कोसळले. त्यावेळी घरात किशोर व त्रिशेली हे पती-पत्नी होते. तर, दोन्ही मुले बाहेर होती, दरम्यान ही घटना घडली. यावेळी परिसरातील लोक धावून आले त्यांनी मलब्यात दबलेल्या किशोर व त्रिशेली यांना बाहेर काढले. मेडिकलमध्ये डॉक्टरांनी किशोरला तपासून मृत घोषित केले.
पावसामुळे नागपूरकरांची धावाधाव
सकाळपासून रिपरिप सुरू असताना दुपारी मात्र पाऊस जाेरात धडकला. ही काेसळधार दीड-दाेन तास सुरू हाेती. मुसळधार पावसामुळे नागपूरकरांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पावसाचे पाणी ओसंडून वाहत हाेते. शंकरनगर, मेडिकल चाैक, धंताेली, पडाेळे चाैक, नरेंद्रनगर, नरेंद्रनगर पूल, त्रिमूर्तीनगर आदी भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले हाेते. त्यामुळे वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप झाला. अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. विविध भागांतील झाेपडपट्ट्यांमध्ये नागरिकांची दैनावस्था झाली आहे.
पारशिवनीत जाेरधार, बाकी शांत
तीन-चार दिवसात पावसाच्या तडाख्याने हवालदिल झालेल्या सावनेर तालुक्याला गुरुवारी दुपारनंतर उसंत मिळाली. पावसाची रिपरिप सुरू हाेती, पण जाेर कमी हाेता. गुरुवारी जिल्ह्यात सर्वाधिक जाेर पारशिवनी तालुक्यात हाेता. येथे सकाळपर्यंत ४७.९ मि.मी. पावसाची नाेंद झाली. दिवसभरही रिपरिप कायम हाेती. उमरेड, कुही, भिवापूर, काटाेल, नरखेड आदी तालुक्यात हलका पाऊस झाला.