विदर्भात अतिवृष्टीमुळे दाणादाण, प्रमुख मार्ग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 08:47 PM2022-08-10T20:47:41+5:302022-08-10T20:48:22+5:30

Nagpur News संततधार पावसामुळे विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये प्रमुख मार्ग ठप्प झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीला पुराचा जबर फटका बसला.

Heavy rains in Vidarbha lead to blockage of major roads | विदर्भात अतिवृष्टीमुळे दाणादाण, प्रमुख मार्ग ठप्प

विदर्भात अतिवृष्टीमुळे दाणादाण, प्रमुख मार्ग ठप्प

Next
ठळक मुद्दे प्रकल्प तुडुंब, विसर्गामुळे शेती पाण्याखाली

नागपूर : संततधार पावसामुळे विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये प्रमुख मार्ग ठप्प झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीला पुराचा जबर फटका बसला. अनेक प्रकल्प तुडुंब भरले असून विसर्गामुळे नद्यांना पूर आलेला आहे. बहुतांश भागात शेती पाण्याखाली गेल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्प १०० टक्के तर मोठ्या प्रकल्पांची सरासरी ९० टक्क्यांवर पोहोचली आहे. नवेगाव खैरी धरणाचे १६ दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत १४ हजार मि.मी. पाऊस पडलेला आहे. जो ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसाच्या सरासरीच्या दुप्पट आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरलेली आहेत. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

भंडारा जिल्ह्यातील महामार्गासह ७२ ग्रामीण मार्ग बंद

भंडारा जिल्ह्यात मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील ७२ मार्ग बुधवारी सकाळपासून बंद पडले. गत २४ तासांत जिल्ह्यात ९४.०९ मिमी पाऊस कोसळला असून २२ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शेकडो घरात पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. २४ तासांत ९४.०९ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक १९० मिमी पाऊस तुमसर तालुक्यात कोसळला. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर तुमसर तालुक्यात नाल्याच्या पुरामुळे हा महामार्ग सकाळपासून ठप्प झाला आहे. यासोबतच मोहाडी ते बालाघाट हा राज्य महामार्गही बंद आहे. मोहाडी शहराजवळील नाल्याला आलेल्या पुराने मोहाडी ते तुमसर हा रस्ता बंद पडला असून मोहाडी येथील १७ कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत हलविण्यात आले आहे.

गोसे प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडले

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रणासाठी या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून ६७७८.२७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाणीपातळी वाढल्यास १२ हजार ते १६ हजार क्युसेक्सपर्यंत पाणीपातळी टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात १४ प्रमुख मार्ग बंद

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने तर काही ठिकाणी खोलगट रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे १४ प्रमुख मार्गांवरील वाहतूक बुधवारी दिवसभर बंद होती. गडचिरोली ते चंद्रपूर मार्ग वगळता जिल्हा मुख्यालयाशी जोडणारे बहुतांश मार्ग बंद आहेत.

तिरोडा व गोंदिया तालुक्यात पूरपरिस्थिती

गोंदिया जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १३३ मिमी पावसाची नोंद झाली असून, तिरोडा, गोरेगाव, गोंदिया तालुक्यांत सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याने या तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातील फ्रेडन्स काॅलनी परिसरात पाणी साचल्याने येथील ३८ कुटुंबांना फुलचूरटोला येथील आयटीआयमध्ये ठेवण्यात आले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील चाळीसहून अधिक मार्ग बंद आहेत्. तर एसटीच्या २९८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने पुजारीटोला, कालीसरार, संजय सरोवर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशय ओव्हरफ्लो झालत्त. तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशयसुद्धा ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. गोरेगाव तालुक्यातील कटंगी नाला बंद, पिंडकेपार नाला बंद, मरारटोला नाला बंद, नवरगाव बागडबंद नाला बंद, तिमेझरी नाला बंद, बोरगांव नाला बंद, घोटी-म्हसगावजवळील पांगोली नदीला पूर आल्याने मार्ग बंद, फुलचूर-तुमखेडा, टेमणी कटंगी मार्गावरील पांगोली नदीला पूर आल्याने मार्ग बंद झालेला आहे. गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील राज्य मार्गावरील पुलावर पाणी असल्याने गोंदिया-तिरोडा मार्ग बंद झाला आहे. तिरोडा तालुक्यातील बरबसपुरा गावाजवळील नाला ओव्हरफ्लो झाल्याने वाहतूक बंद झाली आहे. गोंदिया-आमगाव, गोरेगाव-सडक अर्जुनी, गोंदिया-तुमसर हे मार्ग बंद झाले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरीप सुरूच

यवतमाळ : सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १८.७ मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा जोर नसला तरी इतर जिल्ह्यांतील धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

१० गोंदिया- गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील गराडा गावाला पुराने वेढा घातला.

१० भंडारा- भंडारा जिल्ह्यातील परसोडी गावातील अनेक घरे पाण्याखाली आली.

10gdph16-भामरागड ते लाहेरी मार्गावर पामुलगौतम नदीच्या बॅक वॉटरमधून नावेने पलीकडे जाताना नागरिक.

Web Title: Heavy rains in Vidarbha lead to blockage of major roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर