विदर्भात मुसळधार पावसाचा तडाखा; नागपूर शहरात ६ तासात २१७ मि.मी. पाऊस

By निशांत वानखेडे | Published: July 20, 2024 07:12 PM2024-07-20T19:12:07+5:302024-07-20T19:15:18+5:30

चंद्रपुरात दाेघे वाहून गेले : गडचिराेलीत २७ रस्ते पाण्यात, शेकडाे गावांचा संपर्क तुटला; गाेसीखुर्द, पुजारीटाेला, नांद, लाल नाला धरणाचे दरवाजे उघडले

Heavy rains lash Vidarbha; 217 mm rain in Nagpur city in 6 hours. | विदर्भात मुसळधार पावसाचा तडाखा; नागपूर शहरात ६ तासात २१७ मि.मी. पाऊस

Heavy rains lash Vidarbha; 217 mm rain in Nagpur city in 6 hours.

नागपूर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या २४ तासात विशेषत: पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात मुसळधार पावसाने जाेरदार तडाखा दिला. सर्वत्र, सर्वदूर संततधार पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दाेन तरुण नाल्याच्या पुरात वाहून गेले. गडचिराेली जिल्ह्यात २७ रस्ते पाण्याखाली असून भामरागडसह शेकडाे गावाचा संपर्क तुटला. नागपूर शहरात पहाटेपासून ६ तासात २१७ मि.मी. पाऊस झाला असून शेकडाे वस्त्या जलमय झाल्या. भंडारा, वर्धा, गाेंदिया या जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून गाेसीखुर्दसह सर्व प्रमुख धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्याला शुक्रवारपासून मुसळधार पावसाने चांगलेच झाेडपले. शनिवारी सकाळपर्यंत ब्रम्हपुरी येथे तब्बल १८९ मि.मी. पाऊस झाला. नागभिड तालुक्यात विलम नाल्यात एक व बाेथली नाल्यात एक असे दाेन तरुण वाहून गेले. ॠणाल प्रमोद बावणे (११) व स्वप्नील हेमराज दोनोडे (३०) असे मृतकांची नावे आहेत. इतर नालेही ओव्हरफ्लाे झाले आहेत. १०० च्यावर घरांची पडझड झाली असून पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली. गडचिराेली जिल्ह्यातही ४० पैकी २३ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून ठिकठिकाणी नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शहराला जाेडणारे २७ रस्ते पाण्याखाली गेले असून भामरागड शहरासह  शेकडाे गावांचे संपर्क तुटले आहेत.

नागपूर शहरात या माेसमात पहिल्यांदा पावसाचा तडाखा बसला. सकाळी ५.३० वाजतापासून १२ वाजतापर्यंत तब्बल २१७.२ मि.मी. पावसाची नाेंद झाली. अतिवृष्टीमुळे शहरातील ५०० च्यावर वस्त्या जलमय झाल्या. वेगवेगळ्या ठिकाणी पुरात अडकलेल्या १०० पेक्षा अधिक नागरिकांना प्रशासनाच्या टीमने सुरक्षितपणे बाहेर काढले. शहराला जाेडणारे काही तालुक्याचे मार्गही बंद पडले हाेते. दुसरीकडे भंडारा, गाेंदिया, वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा तडाखा बसला. यादरम्यान भंडारा जिल्ह्यातील गाेसीखुर्द धरणाचे ३० दरवाजे, चंद्रपूरच्या ईरई धरणाचे ७ दरवाजे, गाेंदिया जिल्ह्यात पुजारीटाेला धरणाचे सर्व ११ दरवाजे तसेच वर्धा जिल्ह्यात नांद धरणाचे ७ व लाल नाला प्रकल्पाचे ५ दरवाजे सुरक्षेच्या दृष्टीने उघडण्यात आले आहेत.

Web Title: Heavy rains lash Vidarbha; 217 mm rain in Nagpur city in 6 hours.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.