अखेर जाेरदार पूर्व माेसमी पावसाने सुखावले नागपूरकर

By निशांत वानखेडे | Published: June 17, 2024 07:14 PM2024-06-17T19:14:09+5:302024-06-17T19:17:02+5:30

२४ ते ४८ तासात मान्सून आगमनाची शक्यता : शहरात १८ मिमी पावसाची नाेंद

Heavy rains lashed most parts of the district including Nagpur city | अखेर जाेरदार पूर्व माेसमी पावसाने सुखावले नागपूरकर

अखेर जाेरदार पूर्व माेसमी पावसाने सुखावले नागपूरकर

नागपूर : नवतप्यापासून प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या नागपूरकरांना साेमवारी अखेर पावसाचा गारवा मिळाला. दुपारनंतर शहरासह जिल्ह्याच्या बहुतेक भागात जाेरदार पावसाने धडक दिली. तास-दीड तास चाललेल्या मुसळधार पावसाने मातीला चिंब भिजविले व उकाडा काढून घेतला. मात्र या मान्सूनच्या नाही तर पूर्व माेसमी पावसाच्या सरी आहेत व येत्या २४ ते ४८ तासात माेसमी पावसाचे आगमन हाेऊ शकते, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली.

२३ मे ते २ जूनपर्यंत नवतप्याचा भयंकर ताप आणि ३ जूनपासून १६ जूनपर्यंत पूर्वमाेसमी बाष्पाने वाढलेल्या उकाड्याने नागरिकांचे हालहाल करून साेडले. त्यामुळे कधी एकदा माेसमी पाऊस पडेल, याची प्रतीक्षा लाेकांना हाेती. मान्सूनचे देशात व त्यानंतर महाराष्ट्रातही लवकर आगमन हाेऊनही विदर्भातील नागरिकांना त्याचा लाभ मिळाला नव्हता. अकाेला, अमरावती, यवतमाळ व चंद्रपूरला काही प्रमाणात पूर्व माेसमीच्या सरी बरसल्या, पण त्याचा आनंद फार काळचा नव्हता व पुन्हा पावसाने दडी मारली. नागपूरसह पूर्व विदर्भाचे बहुतेक जिल्हे या पावसापासूनही वंचित हाेते.
या दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर साेमवार १७ जूनला नागपूर जिल्ह्यात वादळ व विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसाने जाेरदार धडक दिली. दुपारी ४ वाजतापासून मुसळधार पाऊस सुरू झाला, जाे तासभर सुरू हाेता. त्यानंतरही रिपरिप चालली हाेती. शहरात सायंकाळी ५ वाजतापर्यंत १८ मिमी पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यात काटाेल, नरखेड, रामटेक, सावनेर, कळमेश्वर, हिंगणा, नागपूर ग्रामीण या भागात पावसाची हजेरी हाेती. कामठी, माैदा, पारशिवनी, उमरेड, भिवापूर, कुही या भागात मात्र हजेरी नव्हती.

शेतकऱ्यांनी करू नये पेरणीची घाई

- विदर्भात अजुनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. नागपूर झालेला पाऊस हा पूर्वमाेसमी पाऊस असून ताेही ठराविक भागात आहे.
- बंगालची शाखा लवकरच झेपावणार असल्याने पुढच्या दाेन दिवसात कधीही मान्सूनचे आगमन हाेण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.
- यानंतर २५ ते २८ जून या काळात विदर्भातील बहुतेक भागात जाेरदार पावसाचा अंदाज आहे.
- शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा येईपर्यंत पेरणीची घाई करू नये. बहुतेक खरीप पिकांची १५ जुलैपर्यंत पेरणीची मर्यादा आहे.
- धुळ पेरणी केली तर येणारे पिक परतीच्या पावसात सापडून नुकसान हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- दाेन चार दिवस उशीरा पेरणी केल्यास पिकांच्या वाढीवर व उत्पादनावरही फारसा परिणाम हाेत नाही, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.

Web Title: Heavy rains lashed most parts of the district including Nagpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.