मुंबईतील मुसळधार पावसाचा नागपुरातील प्रवाशांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:13 AM2019-08-05T11:13:05+5:302019-08-05T11:15:46+5:30
मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. रविवारी रात्री सेवाग्राम एक्स्प्रेस प्लॅटफार्मवर लागल्यानंतर ही गाडी अचानक रद्द केल्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. रविवारी रात्री सेवाग्राम एक्स्प्रेस प्लॅटफार्मवर लागल्यानंतर ही गाडी अचानक रद्द केल्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातला. प्रवाशांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात धाव घेतली. परंतु मुंबईत जोरदार पाऊस सुरू असून रेल्वे रुळावर पाणी आल्यामुळे गाडी रद्द करण्यात आल्याचे सांगितल्यानंतर प्रवासी शांत झाले. त्यानंतर नागपूर-मुंबई दुरांतोही रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले. दरम्यान या दोन्ही गाड्यांनी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली
मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर झाला आहे. रविवारी १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळी प्लॅटफार्मवर लागली. या गाडीत प्रवासी चढले. परंतु त्यानंतर ही गाडी रद्द करण्यात आल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली. गाडी अचानक रद्द केल्यामुळे प्रवासी संतापले. त्यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय गाठून गोंधळ घातला.
परंतु रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे मुंबई मार्गावरील सर्वच गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. त्यामुळे प्रवासी शांत झाले.
त्यानंतर रेल्वे प्रशासनाने १२२९० नागपूर-मुंबई एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्याचे जाहीर केल्यामुळे या गाडीने मुंबईला जाणाºया प्रवाशांना आपले तिकीट रद्द करण्याची पाळी आली. दोन्ही गाड्यातील प्रवाशांना तिकीट रद्द केल्यानंतर १०० टक्के रक्कम परत करण्यात आली.
प्रवासी इगतपुरीत अडकले
शनिवारी १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस नियोजित वेळेनुसार शनिवारी नागपुरातून सुटली. ही गाडी पहाटे ४.४५ वाजता इगतपुरीला पोहोचली. परंतु येथून ही गाडी पुढे जाऊ शकली नाही. सकाळ होऊनही गाडी पुढे जात नसल्याचे पाहून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली. यावेळी गाडीतील लोकोपायलट, गार्ड आणि टीटीई प्रवाशांना माहिती देत नव्हते. प्रवाशांनी स्टेशन व्यवस्थापकांना विचारणा केली असता त्यांनी दुरांतो एक्स्प्रेस पुढे चालविण्यात येईल, परंतु ही गाडी सर्व रेल्वेस्थानकावर थांबत जाईल, असे सांगितले. यामुळे प्रवाशांना ही गाडी पुढे जाण्याची शक्यता वाटली.
दरम्यान या गाडीतील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे भुकेमुळे हाल झाले. दुपारी ३.३० वाजता गाडीतील नागपूर येथील रहिवासी शाम गुलाटी यांनी दुरांतो एक्स्प्रेस इगतपुरीला रिकामी करून ही गाडी परत पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रवाशांनी पुन्हा स्टेशन व्यवस्थापकांकडे धाव घेऊन चुकीची माहिती दिल्याबद्दल त्यांची कानउघाडणी केली. त्यावर काही प्रवाशांनी मुंबईला जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यानंतर प्रवाशांसाठी कल्याणपर्यंत बसची व्यवस्था करण्यात आली.
विदर्भ एक्स्प्रेस वर्धा येथे समाप्त
मुंबईत मुसळधार पावसाचा फटका विदर्भ एक्स्प्रेसमधील प्रवाशांनाही बसला. विदर्भ एक्स्प्रेस सायंकाळी ५.१५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावरून सुटली. परंतु ही गाडी अचानक वर्धा येथे समाप्त करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेऊन वर्ध्याला ही गाडी थांबविली. तर रेल्वेगाडी क्रमांक १२१५२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडीही सेवाग्रामला समाप्त करण्यात आली.
मुंबईवरून सुटणाऱ्या नऊ गाड्या रद्द
दरम्यान मुंबई सुटणाऱ्या नऊ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यात १२१०५ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस, १२८०९ मुंबई-हावडा मेल, १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, १२१४५ लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर एक्स्प्रेस, १२८६९ छत्रपती शिवाजी टर्मिनस-हावडा एक्स्प्रेस आणि १२२६१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा दुरांतो एक्स्प्रेस, ११४०१ मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस, १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान या गाड्या सोमवारी नागपुरात येणार नाहीत. यामुळे या गाड्यांनी नागपूरला येणाऱ्या आणि हावडाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
एअर इंडिया विमानाला तीन तास विलंब
मुंबईतील मुसळधार पावसासह अन्य काही तांत्रिक कारणामुळे एअर इंडियाचे ६२९ विमान तीन तास विलंबाने नागपुरात पोहचले. या विमानाची नागपुरात पोहचण्याची निर्धारित वेळ रात्री ८.३५ वाजताची आहे. परंतु, हे विमान रात्री ११.३० वाजता नागपुरात आले. याशिवाय, इंडिगो एअरलाईन्सचे ६ई-२०४३ हे दिल्ली-नागपूर विमान ४१ मिनिटे, ६ई-५४८८ हे मुंबई-नागपूर विमान ४५ मिनिटे तर, ६ई-४०३ हे मुंबई-नागपूर विमान ३० मिनिटे विलंबाने पोहचले. ६ई-१४७ नागपूर-पुणे विमान रद्द करण्यात आले.