नागपुरात दमदार बरसल्या मेघधारा : २८.५ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:30 PM2020-06-12T23:30:00+5:302020-06-12T23:36:40+5:30
विदर्भात दाखल झालेला मान्सून उपराजधानीत कधीही सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात यासंदर्भात हवामान खात्याकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी शहरात दमदार पाऊस झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात दाखल झालेला मान्सून उपराजधानीत कधीही सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात यासंदर्भात हवामान खात्याकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी शहरात दमदार पाऊस झाला. सुमारे पाऊण तास विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे काही सखल भागात पाणीदेखील साचले होते. रात्री ८.३० वाजेपर्यंत शहरात २८.५ मिमी पावसाची नोंद झाली.
मागील वर्षी शहरात २२ जून रोजी मान्सून सक्रिय झाला होता व त्याच्या दुसऱ्या दिवशी घोषणा झाली होती. यावर्षी चांगला पाऊस येण्याचा अंदाज आहे. जर शनिवारी मान्सून शहरात सक्रिय झाल्याची घोषणा झाली तर यंदा मान्सूनमध्ये सरासरीहून चार दिवसाचाच विलंब नोंदविण्यात येईल.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दबावामुळे मान्सूनने गती पकडली व पूर्व विदर्भातून मान्सूनने पुढे मार्गक्रमण केले. शुक्रवारी विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा येथे मान्सून पोहोचल्याची घोषणा हवामान खात्याने केली आहे.
विदर्भात २४ तासात सक्रिय होणार मान्सून
विदर्भातील काही जिल्ह्यात मान्सून पोहोचला आहे. यात गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश आहे. नागपूरसह उर्वरित जिल्ह्यात मान्सून २४ तासात सक्रिय होण्याच अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळेच मान्सूनला गती मिळाली आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक एम.एल.साहू यांनी दिली.