नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; उकाड्याने हैरान नागरिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 11:20 AM2022-05-19T11:20:50+5:302022-05-19T12:09:03+5:30
काल रात्री अचानक पावसाच्या सरी पडल्याने वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांनाही थोडा दिलासा मिळाला आहे.
नागपूर : नागपूरमध्ये बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. उष्णतेने अंगाची काहीली होत आहे. मात्र, काल रात्री अचानक पावसाच्या सरी पडल्याने वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांनाही थोडा दिलासा मिळाला आहे.
नागपूरसह गेल्या चार दिवसांपासून तापमानात चढ-उतार सुरू आहे. पारा कधी ४५ पेक्षा अधिक तर कधी ४० पेक्षा खाली उतरत आहे. बुधवारी पुन्हा कमाल तापमान १.६ अंशाने घसरून ४१.८ अंशावर पोहोचले. आकाशात दाटलेले ढग व तापमानात चढ-उतार होत असल्याने दमट वातावरणामुळे नागपूरकर हैराण झालेत. अशातच बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याला प्रारंभ झाला. विजांच्या गडगडाटात माेठ्या थेंबाच्या पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड ते दोन तास वादळी पाऊस काेसळत हाेता.
दरम्यान, राज्यातील कोकण किनारपट्टी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तर, विदर्भाच्या भागात उष्णतेची लाट कायम असणार आहे.