भिवापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:10 AM2021-09-22T04:10:34+5:302021-09-22T04:10:34+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : तालुक्यात पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वदूर मुसळधार पाऊस बरसला. त्यानंतर दिवसभर अधूनमधून ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : तालुक्यात पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वदूर मुसळधार पाऊस बरसला. त्यानंतर दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी बसरत हाेत्या. तालुक्यात दिवसभरात एकूण १२८.१ मिमी. पावसाची नाेंद करण्यात आली. या पावसामुळे सर्व नदी, नाल्यांना माेठा पूर आल्याने काही गावांमध्ये तर बहुतांश शेतात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले हाेते. शिवाय, पिकांचे अताेनात नुकसानही झाले. तालुक्यातील प्रत्येक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती.
सुमारे चार तास काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच ८० टक्के पाणीसाठा असलेले नांद-शेडेश्वर १०० टक्के भरले. त्यामुळे मध्येच पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. शिवाय, तालुक्यातील नांद, चिखलापार, नक्षी व चिखली या नद्यांसह त्यांना मिळणाऱ्या सर्व नाल्यांना माेठा पूर आला हाेता. पाऊस व त्यात धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे नदी व नाल्यांमधील पाणी तुंबले. त्यामुळे परिसरातील शेती व पीक पाण्याखाली यायला सुरुवात झाली.
सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पावसाचा जाेर थाेडा कमी झाला. त्यातच सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पावसाने थाेडी उसंत घेतली हाेती. पुराचे पाणी राेड व पुलांवरून वाहात असल्याने भिवापूर -हिंगणघाट (जिल्हा वर्धा), उमरेड - हिंगणघाट, भिवापूर - चिखली या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. दुपारी ३ वाजेपर्यंत तालुक्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आली नव्हती.
दरम्यान, तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण हाेताच तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ठाणेदार महेश भोरटेकर यांच्यासह महसूल व पाेलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या गावांना भेटी देत पाहणी केली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही ठिकाणी पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. तालुक्यातील नदीकाठच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ३० घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. महसूल विभागाचे अधिकारी प्रत्येक ठिकाणी भेटी देत पाहणी करीत आहेत. आवश्यक ठिकाणी मदत कार्य सुरू केले आहे. पूर ओसरल्यानंतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील, अशी माहिती तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.
...
नक्षी, चिखलापार गावात शिरले पाणी
भिवापूर तालुक्यातील नांद, चिखलापार, नक्षी व चिखली या नद्यांना पूर आल्याने पुराचे पाणी या नदीकाठी वसलेल्या नक्षी व चिखलापार येथील प्रत्येकी २२ घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले हाेते. त्यामुळे नागरिकांच्या घरांमधील जीवनावश्यक साहित्य, धान्य, कापड व इतर वस्तू भिजल्याने त्यांचे माेठे नुकसान झाले.
...
एक हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान
पुराचे पाणी नदीकाठच्या शेतात शिरल्याने नक्षी, महालगाव, चिखलापार, नांद व चिखली शिवारातील एक हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील साेयाबीनचे ९० टक्के पीक कापणीला आले आहे. या पावसामुळे साेयाबीनसह अन्य पिकांचे नुकसान झाल्याची माहिती भास्कर येंगळे, अमित राऊत, अनिकेत वराडे, तुळशीदास चुटे, सुनील इंगळे, गणेश इंगोले, विठ्ठल लेदाळे, सुधाकर पडोळे, देवराव जगथाप, शेषराव भोयर, सोनबा मेश्राम या शेतकऱ्यांनी दिली.
...
राेडवरील पाणी शेतात
उमरेड - चिमूर (जिल्हा चंद्रपूर) या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम जवळी फाट्यापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. हा मार्ग चार फूट उंच तयार करण्यात आल्याने तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी प्रभावी साेय करण्यात न आल्याने राेडवरील पाणी शेतात साचले. त्यामुळे मालेवाडा व चिचाळा शिवारातील पिके पाण्याखाली आली हाेती. पाण्यामुळे पीक सडणार असल्याची माहिती मालेवाडा येथील नारायण इंगोले, धनराज सातपुते, माणिक सातपुते, प्रशांत बारेकर, विनोद लाखे, कवडू सातपुते, आनंद सातपुते, रामू लाखे, अरूण चौधरी, सूर्यभान ढोरे, मंदा इंगोले, संजय कडू, हरीश ढोरे यांनी दिली.