मुसळधार पावसाने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; २३ रेल्वेगाड्या रेंगाळल्या
By नरेश डोंगरे | Published: July 21, 2023 08:32 PM2023-07-21T20:32:53+5:302023-07-21T20:33:54+5:30
संघमित्रा एक्सप्रेस ९ तास ५५ मिनिटे, तर आजाद हिंद एक्सप्रेस ७ तास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वदूर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भारतीय रेल्वेचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत आहेत. नागपूर मार्गे धावणाऱ्या तब्बल २३ गाड्या शुक्रवारी रेंगाळल्या. यामुळे प्रवाशांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या २४ तासांत सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले तुटूंब भरून वाहत आहेत. अनेक प्रांतातील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली आले आहेत. यामुळे विविध भागात धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचा वेग मंदावला असून त्या रेंगाळल्यासारख्या आहेत. नागपूरमार्गे धावणाऱ्या तब्बल २३ रेल्वेगाड्या शुक्रवारी उशिरा नागपुरात पोहचणार आहेत.
या गाड्यांमध्ये संघमित्रा एक्सप्रेस ९ तास ५५ मिनिटे उशिरा, हावड़ा-पुणे आजाद हिंद एक्सप्रेस ७ तास ११ मिनिटे, हावड़ा-पुणे दुरांतो एक्सप्रेस ७ तास, गितांजली एक्सप्रेस ६ तास, शालीमार-एलटी एक्सप्रेस ६ तास २५ मिनिटे, हावड़ा-सीएसएमटी मेल ५ तास, पुरी-आदिलाबाद साप्ताहिक एक्सप्रेस ४ तास २९ मिनिटे, शालीमार-एलटीटी एक्सप्रेस ४ तास ५० मिनटे, सिकंदराबाद एक्सप्रेस ४ तास ४२ मिनिटे, पुरी-जोधपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ३ तास, सीएसएमटी-नागपूर दुरान्तो एक्सप्रेस २ तास २५ मिनिटे, हैदराबाद स्पेशल एक्सप्रेस २ तास ४६ मिनिटे, रीवा-निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस २ तास १० मिनिट, यशवंतपुर-लखनऊ एक्सप्रेस २ तास ४७ मिनिटे, हावडा-अदिलाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस २ तास उशिरा धावत आहे. शुक्रवारी रात्री ७ वाजेपर्यंतचे हे अपडेट असून, या तसेच अन्य आठ गाड्यांच्या विलंबात आणखी भर पडू शकतो.अर्थात या सर्व गाड्या उशिरा धावण्याची वेळ आणखी वाढू शकते, असे रेल्वेचे अधिकारी सांगतात.
खोळंबा झाल्याने प्रवासी वैतागले
सुमारे दोन डझन रेल्वेगाड्या उशिराने धावत असल्याने या गाड्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या रेल्वे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक जण माहिती नसल्याने नियोजित वेळेला रेल्वेस्थानकावर आले. आता मुसळधार पाऊस सुुरू आहे. त्यामुळे ते स्थानकावर ताटकळत उभे आहेत. रेल्वेगाडी यायला आणखी जास्त विलंब होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत असल्याने अनेकजण वैताग व्यक्त करीत आहेत.