रस्ते आणि उड्डाणपुलांवर जड वाहतूक जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:28 AM2020-11-22T09:28:37+5:302020-11-22T09:28:37+5:30

नागपूर : शहरातील रस्ते आणि उड्डाण पुलांवर मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक आदी जडवाहतूक सुरू आहे. लवकरात लवकर शहर सीमेबाहेर ...

Heavy traffic on roads and flyovers | रस्ते आणि उड्डाणपुलांवर जड वाहतूक जोमात

रस्ते आणि उड्डाणपुलांवर जड वाहतूक जोमात

Next

नागपूर : शहरातील रस्ते आणि उड्डाण पुलांवर मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक आदी जडवाहतूक सुरू आहे. लवकरात लवकर शहर सीमेबाहेर जाण्याच्या घाईमध्ये हे ट्रक्स अशा तऱ्हेने वेग वाढवतात की अन्य लहान वाहन चालकांना आपली वाहने बाजूला थांबवून ते जाण्याची वाट बघावी लागत आहे. १५ दिवसापूर्वी शहराच्या आतून जाणाऱ्या ट्रकची संख्या कमी होती. मात्र, आता शहरातील रस्त्यांवर ट्रक्सच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. विशेष म्हणजे, विविध पोलीस स्टेशन्सच्या समोरून वायूवेगाने धावणाऱ्या या जडवाहतुकीवर कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. या अशा अवसानघातकी धोरणामुळे आगामी काळात गंभीर अपघातांचा संशय बळावला आहे.

मॉरिस कॉलेज टी पॉइंटवर गेल्या तीन दिवसांपासून काही ट्रॅफिक पोलीस कर्मचारी ट्रक रोखत आहेत आणि चालानही फाडत आहेत. जोवर एका ट्रकचे चालान बनविल्या जाते, तोवर अनेक ट्रक पोलिसांच्या डोळ्यादेखत पुढे निघाले असतात. त्याच अनुषंगाने ‘लोकमत’ने शहराच्या विविध मार्गांवर ट्रक वाहतुकीचा आढावा घेतला. यात वर्धा रोड, मानकापूरकडे जाणारा मार्ग, अमरावती मार्ग व कामठी रोड शहरातून जाणाऱ्या जडवाहतुकीची संख्या जास्त दिसून आली. यापूर्वी मध्यरात्रीनंतर ट्रक शहरातील रस्त्यांवर दिसत होते. मात्र, आता रात्री १० वाजतापासूनच शहरात ट्रकच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात. विशेष म्हणजे शहरातील काही उड्डाण पुलांवर अशा जड वाहतुकीवर निर्बंध आहेत. मात्र, पोलिसांच्या सुस्तीचा लाभ घेत उड्डाण पुलांवरून ट्रक धावताना दिसून येतात. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या डबलडेकर पुलावरूनही ट्रक वाहतूक होत आहे. शहिद गोवारी उड्डाण पुलावरून अनेक ट्रक एलआयसी चौकापासून सुरू होणाऱ्या उड्डाण पुलाच्या मार्गे शहराच्या बाहेर पडतात. एलआयसी चौकाजवळ तयार झालेल्या उड्डाण पुलावर ट्रक्सच्या गर्दीमुळे रात्री ट्रॅफिक जाम होत असल्याचेही निदर्शनास येते.

----------

बॉक्स...

पथकर वाचविण्याचा खेळ

नियमांनुसार विना कारण जड वाहनांना शहरात प्रवेश करण्याची परवानगी नाही. ट्रकच्या रहदारीसाठी अनेक रिंग रोड बनविण्यात आले आहेत. मात्र, ट्रक चालक पथकर वाचविण्यासाठी शहरात ट्रक घेऊन प्रवेश करत आहेत.

----------

बॉक्स...

उच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्राचे ट्रॅफिक विभागाला विस्मरण

जड वाहतुकीमुळे होत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका सादर झाली होती. याचिकेवरील सुनावणीमध्ये विना काम केवळ अंतर व पथकर वाचविण्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या जड वाहनांना मोटर वाहन कायदा १९८८चे कलम १८४ अंतर्गत १००० रुपये व कलम १७९ अंतर्गत ५०० रुपये दंड ठोठावण्याचे राज्याच्या गृहविभागाने मान्य केले होते. अशी अधिसूचनाही जारी करण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली होती. मात्र, काळ पुढे गेल्यावर गृह विभाग व ट्रॅफिक विभागाला आपल्याच अधिसूचनेचा विसर पडलेला आहे.

-------------

बाॅक्स....

कायद्याचे उल्लंघन हा गुन्हा

नियमांनुसार विना काम शहरात जड वाहनांनी प्रवेश करणे, हा कायदेशीर गुन्हा आहे. ज्या उड्डाण पुलांवरून जड वाहनांना प्रवेश बंदी आहे, तेथून वाहतूक करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. अशांवर कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावावे असे मत ॲड. फिरदौस मिर्जा यांनी व्यक्त केले.

..........

Web Title: Heavy traffic on roads and flyovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.