मासिक पाळीनंतर खुंटते उंची : केवळ दोन इंच वाढते उंची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 06:53 PM2018-01-04T18:53:57+5:302018-01-04T18:57:43+5:30
पूर्वी मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे वय हे साधारण १५ वर्षे होते, परंतु अलीकडे साडेअकरा वर्षातच मुलींना पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात हे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे, मुलींमध्ये मासिक पाळीला सुरुवात झाल्यानंतर उंची खुंटते. जास्तीत जास्त उंचीमध्ये केवळ दोन इंचाची वाढ होते, अशी माहिती प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. हरी मंगतानी यांनी दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : पूर्वी मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे वय हे साधारण १५ वर्षे होते, परंतु अलीकडे साडेअकरा वर्षातच मुलींना पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात हे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे, मुलींमध्ये मासिक पाळीला सुरुवात झाल्यानंतर उंची खुंटते. जास्तीत जास्त उंचीमध्ये केवळ दोन इंचाची वाढ होते, अशी माहिती प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. हरी मंगतानी यांनी दिली.
बालरोग अकादमीच्यावतीने गुरुवारपासून रेशीमबाग परिसरात ५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’ची सुरुवात झाली. या परिषदेत डॉ. मंगतानी सहभागी झाले असून ते पत्रकारांशी बोलत होते.
डॉ. मंगतानी म्हणाले, आपल्याकडे मुला-मुलींच्या उंचीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. मुलांची वाढ नैसर्गिक होते, असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, जेव्हा मुलाची उंची वाढत नाही तेव्हाच आई-वडील डॉक्टरांकडे जातात. यातही उंची जास्त असेल तर डॉक्टरांकडे जात नाही. परंतु या दोन्ही स्थितीत लवकरात लवकर घेतलेला डॉक्टरांचा सल्ला फायद्याचा ठरतो. यावर उपचार आहेत.
शंभरात तीन मुलांमध्ये उंचीची समस्या
डॉ. मंगतानी म्हणाले, लहान मुलांमध्ये कमी उंचीचे प्रमाण १०० मध्ये ३ असे आहे तर जास्त उंचीचे प्रमाण १०० मध्ये २ ते ५ असे आहे. मुला-मुलींमध्ये उंची वाढत नसेल किंवा अति उंच होत चालला असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. थायरॉईड, ग्रोथ हार्माेनची कुठली समस्या आहे याचे निदान करून त्यावर उपचार केला जाऊ शकतो.
दोन-तीन वर्षे एकाच मापाचे शर्ट होत असेल तर धोका
डॉ. मंगतानी म्हणाले, जर दोन ते तीन वर्षे मुलाला एकाच मापाचे शर्ट होत असेल, शूजच्या आकार वाढलेला नसेल, तर मुलामध्ये काहीतरी समस्या आहे हे पालकांनी ओळखायला हवे. यावर डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.
अतिलवकर वयात आल्यास उंचीवर परिणाम
मुलींमध्ये ११ ते १३ वर्षांमध्ये मासिक पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे तर मुलांमध्ये कमी वयातच चेहऱ्यावर केस वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. अति लवकर वयात येण्याच्या या समस्येमुळे उंचीवर परिणाम होतो. उंची खुंटते. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात ही समस्या मोठी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, अयोग्य जीवनशैली, अयोग्य आहार हा आहे.