२५० सफाई कामगारांचे वारसदार नोकरीच्या प्रतिक्षेत()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:23+5:302021-07-07T04:11:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासन निर्णयानुसार एखाद्या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ३० दिवसांत नोकरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासन निर्णयानुसार एखाद्या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ३० दिवसांत नोकरी देणे अपेक्षित आहे. मात्र नागपूर महापालिका प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे २५० सफाई कर्मचाऱ्यांचे वारसदार दहा वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना नोकरीत समावून घ्यावे, यासाठी नागपूर युवक काँँग्रेस व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी महपालिकेतील कार्यालयापुढे बासरीवादन करून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या आंदोलनात प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. महापालिकेतील अधिकारी राजेश लव्हारे यांच्याकडून नियुक्तीसाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप केला. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांनी आपबिती सांगितली. यासंदर्भात चार वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही कार्यवाही होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर बंटी शेळके यांनी शंका व्यक्त केली..
आंदोलनात विक्की बढेल, सुनील जाधव, रोहित खैरवार, अविनाश डेलिकर, बबलू कोंधावे, सुमित गौतेल, लक्की समुंदरे, रिंकू डकाह, अरविंद बक्सरिया, मंगल ग्रवाहकर, रौनक कोंढवे, प्रीती उसरबर्स, गीता डेलीकर, गीता समुंदरे, मीनाक्षी महतो, सीमा असरेट, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष तैसीफ खान, स्वप्निल बावनकर आदी सहभागी झाले होते.
....
अशा आहेत मागण्या
- मृतकांच्या वारसांना तीस दिवसांत नोकरीवर घ्यावे.
- पैशाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
- प्रतीक्षा यादी तातडीने निकाली काढण्यात यावी.