अपघातातील मृताच्या वारसदाराला मिळणार पाच लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 10:15 PM2019-08-29T22:15:48+5:302019-08-29T22:17:13+5:30
नवीन कायद्याप्रमाणे आता मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख तर अपंगत्व आल्यास दोन लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरातील कमावत्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबावर गंभीर संकट कोसळते. पूर्वी ‘थर्ड पार्टी’ वाहन विम्यानुसार मृताच्या वारसदारला ५० हजार तर अपंगत्व आल्यास २५ हजार रुपयांची तरतूद होती. परंतु नवीन कायद्याप्रमाणे आता मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख तर अपंगत्व आल्यास दोन लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळेल.
या नवीन कायद्याची माहिती देताना अॅड. पी. एस. मिराचे म्हणाले, भारत सरकारने मोटार वाहन कायदा १९८८ मध्ये सुधारणा केली आहे. आता २०१९ नुसार ‘थर्ड पार्टी’संबंधी नुकसान भरपाई कलम १६४ प्रमाणे पाच लाख तर जखमी किंवा अपंगत्व आलेल्या व्यक्तीला अडीच लाख रुपये मिळेल. हा ‘क्लेम’ मिळण्यासाठी अर्जदाराने अपघातात दोष सिद्ध करायची आवश्यकता नाही. परंतु वाहन समाविष्ट व उपयोगात होते हे सिद्ध करण्याची गरज आहे. नव्या कायद्याप्रमाणे अपघात झाल्यापासून सहा महिन्याच्या आत ‘क्लेम’ करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, जुन्या कायद्यात अपघातानंतर वाहन न मिळाल्यास म्हणजे ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणामध्ये मृताच्या वारसांना २५ हजार व गंभीर जखमीला १२ हजार रुपयांची तरतूद होती. मात्र नव्या कायद्यानुसार मृताच्या वारसांना दोन लाख तर गंभीर जखमींना ५० हजार रुपये मिळणार आहे. नवा ‘थर्ड पार्टी’ वाहन विमा कायदा हिताचा आहे.