महिलांच्या हेल्मेट जनजागृतीसाठी देशाला गवसणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 10:59 AM2018-12-08T10:59:48+5:302018-12-08T11:02:37+5:30
एक महिला शिकली तर अख्खे कुटुंब शिक्षित होते. त्याचप्रमाणे एका महिलेला हेल्मेटचे महत्त्व कळले तर तिचे कुटुंब हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणार नाही, हाच उद्देश ठेवून मथुरा येथील पूजा यादव देशाच्या यात्रेवर निघाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एक महिला शिकली तर अख्खे कुटुंब शिक्षित होते. त्याचप्रमाणे एका महिलेला हेल्मेटचे महत्त्व कळले तर तिचे कुटुंब हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणार नाही, हाच उद्देश ठेवून मथुरा येथील पूजा यादव देशाच्या यात्रेवर निघाली आहे. तेही एकटीच बाईकवर स्वार होऊन. बुधवारी ती नागपुरात आली असता ‘जनआक्रोश’च्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. भारतात दर दिवसाला विना हेल्मेट चालविणाऱ्या सुमारे ९८ दुचाकीस्वारांचा मृत्यू होतो. ही संख्या हेल्मेटचे महत्त्व सांगणारे आहे, म्हणून याची जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे पूजाचे म्हणणे आहे.
पूजा हिला लहानपणापासूनच ‘बाईक’चे वेड होते. काही वर्षांपूर्वी तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यांनी हेल्मेट घातले असते तर वाचले असते. या घटनेने मैत्रिणीचे अख्खे कुटुंब रस्त्यावर आले. तेव्हापासून हेल्मेटविषयी जनजागृती करण्याची पूजाची इच्छा होती. पतीकडून मिळालेले प्रोत्साहन व एका ‘एनजीओ’च्या मदतीने महिलांमध्ये हेल्मेट जनजागृतीसाठी २० नोव्हेंबरपासून तिने ‘मिशन हेल्मेट’ हाती घेतले. नोएडा येथून हे ‘मिशन’ सुरू झाले.
‘लोकमत’शी बोलताना पूजा म्हणाली, बाईक चालविण्याची प्रेरणा पतीपासून मिळाली. पूर्वी बाईकने लांबचा प्रवास करण्यास भीती वाटायची. परंतु आता अनुभव गाठीशी आहे. आतापर्यंत ५० हजार किलोमीटरची यात्रा केली आहे. या ‘मिशन’मध्ये महामार्गाने विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांना थांबवून त्यांना हेल्मेटविषयी माहिती देते. अपघात कुणाला सांगून येत नाही, यामुळे तुमची काळजी तुम्हीच घेण्याचे आवाहन करते. मैत्रिणीचे कुटुंब एका चुकीने कसे रस्त्यावर आले, त्याची माहिती देते. पोलिसांच्या भीतीने नव्हे तर स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट घाला. हेल्मेट उच्च दर्जाचेच वापरा, अशीही पूजा म्हणाली. नागपूरमध्ये एक दिवसाचा मुक्काम करून गुरुवारी हैदराबादसाठी रवाना होणार आहे. येथून ती विजयवाडा, विशाखापट्टणम्, भुवनेश्वर, कोलकाता, लखनौला जाईल; नंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शहरांना भेट देऊन दिल्ली येथे समारोप होईल. बुधवारी सकाळी पूजाचे नागपुरात आगमन होताच जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड यांनी सत्कार केला. यावेळी सचिव रवींद्र कासखेडीकर, डॉ. सुनीती देव, दिलीप मुक्केवार, प्रमेश शहारे, अशोक करंदीकर, कृष्णकुमार वर्मा, डॉ. प्रवीण लाड व जनआक्रोशचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
विना हेल्मेट ३५ हजार ९७५ दुचाकीस्वारांचा मृत्यू
२०१७ मध्ये देशात रस्ता अपघातात हेल्मेट न वापरता दुचाकी चालविणाऱ्या ३५ हजार ९७५ चालकांचा मृत्यू झाला, तर ३६ हजार ६७८ दुचाकीस्वार जखमी झाले. विना सीटबेल्ट वाहन चालविणाऱ्या २८ हजार ८९६ चालकांचा मृत्यू तर ३३ हजार २६४ जखमी झाले. वाहन चालविताना मोबाईलचा वापर तीन हजार १७२ चालकांचा मृत्यू तर तीन हजार ६६८ चालक जखमी झाले.