हेल्मेट, तरीही या कारणाने होतोय दुचाकीस्वारांनाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 07:56 PM2020-08-01T19:56:57+5:302020-08-01T20:00:30+5:30
मोटारसायकल चालकाच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे हेल्मेट हे व्यक्तिगत सुरक्षेसाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु अनेक दुचाकीस्वार याला गंभीरतेने घेत नाही. केवळ पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी बोगस हेल्मेटचा वापर करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोटारसायकल चालकाच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे हेल्मेट हे व्यक्तिगत सुरक्षेसाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु अनेक दुचाकीस्वार याला गंभीरतेने घेत नाही. केवळ पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी बोगस हेल्मेटचा वापर करतात. अपघात झाल्यास हेच हेल्मेट त्यांच्यासाठी धोकादायक ठरत आहे. पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करताना बोगस हेल्मेटवरही कारवाई करावी, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रस्त्यावर वर्दळीचे प्रमाण कमी आहे. परिणामी, अपघातांची संख्या कमी झाली असलीतरी ती थांबलेली नाही. तज्ज्ञाच्या मते, बनावट हेल्मेट अधिक धोकादायक ठरते. दुचाकीचा अपघात होऊन आपले डोके एखाद्या कठीण पृष्ठभागावर आदळते, तेव्हा अगदी सेकंदभरात डोके काम करेनासे होते. ताशी १० ते १०० कि.मी. वेगाने मोटारबाईक चालविणाऱ्याला होणाऱ्या अपघातात ही प्रक्रिया हानिकारक ठरते. २०० कि.मी. वेगाने जाणाऱ्या दुचाकीचा अपघात होतो तेव्हा निर्माण होणारा आघात ५०००० न्यूटन मापाच्या बलाइतका प्रचंड असतो. या आघाताने कवटीला चिरा जाणे, मेंदूत रक्तस्राव, मेंदूला धक्का, मुका मार; अशा इजा होतात. अशावेळी डोक्यावर असलेले हेल्मेट हा आघात शोषून डोक्याचे रक्षण करण्याचे कार्य करते, परंतु हेच जर हेल्मेट निकृष्ट दर्जाचे असेल तर ते तुटून जखमांमध्ये वाढ करण्यास मदत करते.
दर्जेदार हेल्मेटच का?
हेल्मेटची निर्मिती व रचना ही अपघातात सापडलेल्या मृतदेहाचा सविस्तर अभ्यास, जखमींची तपासणी, प्राण्यावरचे प्रयोग, बायोमेडिकल सर्वेक्षण, संगणकाच्या साहाय्याने तयार केलेला डेटा; यातून निघालेल्या निष्कर्षातून ठरविण्यात आलेले आहे. दर्जेदार हेल्मेट तयार करताना, त्याला हेल्मेटच्या आत असलेल्या मऊ थराची आघात शोषून घेण्याची क्षमता, तीव्रता किंवा तीक्ष्णता बोथट करण्याची क्षमता, हेल्मेट डोक्यापासून अलग होऊ नये यासाठी मजबूत पट्ट्या आणि हेल्मेटच्या कवचाच्या कणखरतेकडे विशेष लक्ष दिले जाते.
स्वस्त मिळते म्हणून हेल्मेट घेऊ नका
रस्त्यावरचे हेल्मेट स्वस्त मिळते म्हणून ते घेऊ नका, असे आवाहन जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर यांनी केले आहे. ते म्हणाले, रस्त्यावरचे हेल्मेट हे रिसायकल केलेल्या हेल्मेटचे असू शकते. अपघाताच्यावेळी बोगस हेल्मेटचे कवच आणि आतील खिळेच धोकादायक ठरतात. अनेक प्रकरणात हेल्मेटचे खिळे डोक्यात शिरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. म्हणूनच बनावट हेल्मेटपासून दूर रहायला हवे.
बोगस हेल्मेटवर कारवाईची मोहीम
‘रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये विना हेल्मेट असलेल्या चालकांची संख्या मोठी आहे. यात आता बोगस हेल्मेटमुळे गंभीर जखमी होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. निकृष्ट दर्जाचा हेल्मेटचा वाढता वापर पाहता लवकरच यावर कारवाई मोहीम हाती घेण्यात येईल.
-विक्रम साळी, पोलीस उपायुक्त (वाहतूक)