शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:49 PM2019-02-19T23:49:17+5:302019-02-19T23:50:23+5:30
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील संजयसिंह दीक्षित राजपूत (मलकापूर) व नितीन शिवाजी राठोड (गोवर्धननगर,पो. बिबी) यांच्या कुटुंबीयांना हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरने मंगळवारी १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली. दोघांच्याही पत्नींना प्रत्येकी एक लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला व चार अपत्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मुदतठेव करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील संजयसिंह दीक्षित राजपूत (मलकापूर) व नितीन शिवाजी राठोड (गोवर्धननगर,पो. बिबी) यांच्या कुटुंबीयांना हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरने मंगळवारी १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली. दोघांच्याही पत्नींना प्रत्येकी एक लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला व चार अपत्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मुदतठेव करण्यात आली. राजपूत यांना दोन मुले तर, राठोड यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.
या उपक्रमाद्वारे शहरातील वकिलांनी पुन्हा एकदा आपले सामाजिक कर्तव्य जपले. यापूर्वी त्यांनी केरळ पूरपीडितांना मोठी आर्थिक मदत गोळा केली होती. शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी संघटनेने सोमवारी दुपारी १२.३० वाजतापर्यंतची वेळ निश्चित केली होती. त्यानंतर दोन्ही शहिदांच्या घरी जाऊन मदत प्रदान करण्यात येणार होती. परंतु, मदतीचा ओघ रात्रीपर्यंत कायम राहिला. परिणामी, दोन्ही शहिदांच्या कुटुंबीयांना मंगळवारी मदत प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. वकिलांनी या उपक्रमाला भरभरून सहकार्य करून एकजुटीचे दर्शन घडविले. संघटनेने गत शुक्रवारी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा ठराव पारित करून, त्यात दहशतवाद्यांविरुद्ध तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या.