गिट्टी व रुळ बसविण्याचे काम सोबतच
By admin | Published: February 21, 2017 02:30 AM2017-02-21T02:30:43+5:302017-02-21T02:30:43+5:30
मेट्रो रेल्वे सुरुवातीला सहा किलोमीटरपर्यंत जमिनीवरून धावणार आहे. या भागाच्या सबग्रेडचे काम अगोदरच पूर्ण झाले आहे.
माझी मेट्रो : सहा किमी जमिनीवर धावेल मेट्रो
नागपूर : मेट्रो रेल्वे सुरुवातीला सहा किलोमीटरपर्यंत जमिनीवरून धावणार आहे. या भागाच्या सबग्रेडचे काम अगोदरच पूर्ण झाले आहे. आता गिट्टीकरणाचे काम सुरू असून ते सुद्धा पूर्णत्वास आले आहे. गिट्टीकरणानंतर प्रीस्टेट काँक्रिट स्निपर्स (काँक्रिटच्या पाट्या) टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. यासोबतच स्निपर्सवर रुळ टाकण्याचे कामही केले जाईल. दोन्ही कामे एकाच वेळी सोबतच केली जात असल्याने ते काम तातडीने पूर्ण करण्यास मदत होईल.
मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी दोन प्रकारच्या रुळाचा वापर करण्यात येणार आहे. मुख्य मार्गासाठी ६० किलो वजन असलेल्या ‘हेड हार्डन्ड’ रुळांचा उपयोग केला जात आहे. मुख्य मार्गावर वाहनांची सातत्याने ये-जा राहील. त्यामुळे वरच्या भागात रुंद असलेले रुळ असल्याने भार वहन करण्याची क्षमता वाढेल, सोबतच तडकण्याची भीती कमी होईल. त्यांची देखरेख कमी करावी लागेल. त्यामुळे मेंटेनेन्स खर्च कमी येईल. डेपोमध्ये ६० किलो वजनाच्या सामान्य रुळांचा उपयोग केला जात आहे. कारण या भागात वाहनांची ये-जा आणि गती कमी असते. मिहान डेपो ते खापरीपर्यंतचे हे काम एप्रिल २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
जर्मनी व स्पेनची कंपनी सिग्नल व्यवस्था उपलब्ध करणार
जर्मनीतील सिमन्स लिमिटेड आणि स्पेनच्या सिमन्स रेल्वे आॅटोमेशन यांना संयुक्तपणे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून २८७ कोटी रुपयांची आॅर्डर मिळाली आहे. याअंतर्गत दोन्ही कंपन्या नागपूर मेट्रोच्या पहिल्या दोन लाईन उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम या मार्गासाठी सिग्नल व्यवस्था उपलब्ध करून देईल. सूत्रानुसार या संयुक्त आॅर्डरमध्ये सिमन्स लिमिटेडचा हिस्सा १४६ कोटी रुपये आहे. या प्रकल्पात दूरभाष आधारित रेल्वे नियंत्रण प्रणालीला ३८.२ किलोमीटर लांब दुहेरी रेल्वे लाईनवर टाकण्यात येणार आहे; सोबतच २३ रेल्वेगाड्यांवरही हे उपकरण लावण्यात येणार आहे. या रेल्वे लाईनवर ३६ स्टेशन आणि दोन डेपो आहेत.