प्रवाशांना विचारणा... मे आय हेल्प यू ? रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी मदत केंद्र : गर्दी नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात
By नरेश डोंगरे | Published: April 22, 2024 02:45 PM2024-04-22T14:45:02+5:302024-04-22T14:46:33+5:30
नागपूर: मे आय हेल्प यू ? ची हाक देत धावपळ करणाऱ्या प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पथके तैनात
नागपूर : वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांना त्रास होत असल्याचे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर मदत केंद्र तयार केले आहे. धावपळ करणाऱ्या प्रवाशांना या बूथवरून 'मे आय हेल्प यू', अशी विचारणा केली जात आहे.
महिनाभरापासून नागपूर स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. आधीच बाहेरून येणाऱ्या गाड्या प्रवाशांनी खचाखच भरून येत आहे. त्यात नागपूर स्थानकावरून चढणाऱ्या प्रवाशांची भर पडत असल्याने गाड्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. त्यामुळे प्रवासी चक्क टॉयलेटजवळ उभे राहून प्रवास करीत आहेत. त्याचा त्रास कन्फर्म तिकिट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. त्यासंबंधाने रोज मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असल्यामुळे रेल्वेच्या स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. एसी, स्लीपर आणि जनरल डब्यांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ज्या दर्जाचे तिकिट त्याच डब्यांमध्ये प्रवाशांना चढू दिले जाते. जनरलचे तिकिट घेऊन दुसऱ्या डब्यात शिरणाऱ्या प्रवाशांवर तसेच विनातिकिट प्रवाशांवरही कडक कारवाई करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे.
गर्दीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना डब्यात चढताना, उतरताना त्रास होतो. अशा प्रवाशांना मदत केली जात आहे. गाडी कधी येणार, कोणत्या फलाटावर लागणार, यासंबंधाने माहिती देण्यासाठी किंवा प्रवाशांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर त्यांना ईकडे तिकडे भटकावे लागू नये यासाठी, रेल्वे स्थानकांवर मदत केंद्र (बूथ) लावण्यात आले आहे. येथे प्रवाशांना माहिती देऊन आणि मार्गदर्शन केले जात आहे. गर्दी टाळण्यासाठी जादा भाडे घेऊन जे तिकिट (ईएफटी) दिले जाते, ते बंद करण्यात आले आहे.
विशेष गाड्या वाढविण्यावर भर
रेल्वेचा प्रवास आरामदायक व्हावा यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करीत असल्याची माहिती रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी दिली आहे. नागपूर-पुणे मार्गावरील गर्दी टाळण्यासाठी विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात आली असून, आठवड्यातून तीन दिवस ती सेवा देत आहे. या शिवाय परप्रांतिय प्रवाशांच्या सेवेसाठी नागपूरहून थेट गोरखपूर(यूपी)साठी विशेष ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही गाडी प्रवाशांना रोज सेवा देत आहे. या शिवायही अन्य आवश्यक उपाययोजना आम्ही करीत असल्याचे अमन मित्तल यांनी सांगितले आहे.