विजेच्या साहाय्याने मेट्रो रेल्वे रुळावर धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 01:53 AM2017-08-13T01:53:33+5:302017-08-13T01:54:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहान डेपोमध्ये मेट्रो रेल्वेचा ‘ट्रायल रन’ १५ आॅगस्टला घेण्याची तयारी पूर्ण झाली होती, पण शनिवारी खापरी फिडरमधून डेपोला वीज पुरवठा होताच कंपनीने तीन दिवसांपूर्वीच अर्थात शनिवारी विजेच्या साहाय्याने ‘ट्रायन रन’ पूर्ण केली.
मिहान डेपोला शनिवारी खापरी येथील फिडरमधून पुरवठा करण्यात आला आहे. ओएचईने २५ हजार व्होल्ट विजेचे कनेक्शन रेल्वेच्या ‘पेंटो’ला जोडण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच ओएचई कनेक्शनच्या चाचणीचे काम पूर्ण झाले होते. बुलंद शंटिंग कारऐवजी आता मेट्रोला विजेच्या साहाय्याने रेल्वेचे संचालन रुळावर करण्यास प्रारंभ झाला आहे.
हॉर्न वाजवून चालकाने मेट्रो रेल्वे रुळावर पुढे नेली. डेपोमध्ये उपस्थित महामेट्रोचे अधिकारी आणि कर्मचाºयांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. या उपलब्धीसाठी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी पुढाकार घेतला.