बुद्धपौर्णिमेला गरजूंना मदत करा : भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 07:07 PM2020-05-06T19:07:12+5:302020-05-06T19:09:20+5:30
तथागत गौतम बुद्ध यांनी शांती, मैत्री, करुणा आणि कल्याणाचा मार्ग सांगितला. त्याच मार्गाचा अवलंब करीत बुद्धपौर्णिमेला गरजूंना मदत करा, बुद्धजयंती सामूहिकरीत्या साजरी करू नका, घरीच बसून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन करा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तथागत गौतम बुद्ध यांनी शांती, मैत्री, करुणा आणि कल्याणाचा मार्ग सांगितला. त्याच मार्गाचा अवलंब करीत बुद्धपौर्णिमेला गरजूंना मदत करा, बुद्धजयंती सामूहिकरीत्या साजरी करू नका, घरीच बसून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन करा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले आहे. ७ मे रोजी बुद्धजयंती आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असून गरिबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा संकटकाळी समाजाची जबाबदारी वाढली आहे. ज्यांची आर्थिक स्थिती भक्कम आहे, अशा प्रत्येकांनी एका कुटुंबाची मदत करावी. हीच खरी बुद्धजयंती ठरेल, असेही ससाई म्हणाले.
शहरातील शेकडो बुद्धविहारांत जयंती साजरी केली जाते. काही ठिकाणी खीरदान, भोजनदान आणि खाद्यपदार्थांचे वितरण केले जाते. मात्र, कोरोनाच्या संकटाला मूठमाती देण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी खबरदारी घ्यायची आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये सामूहिक पद्धतीने जयंती साजरी करू नका. शहरातील सर्व बुद्धविहार कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी. घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर त्रिशरण व पंचशील ग्रहण करून बुद्धजयंती साजरी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
बॉक्स...
लॉकडाऊनपर्यंत जेवणाचे डबे
भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या मार्गदर्शनात इंदोरा बुद्धविहार कमिटीतर्फे सकाळ-सायंकाळ गरजू आणि गरिबांना जेवणाचे डबे वाटप केले जात आहेत. दररोज ५ हजार जेवणाचे डबे तयार करून विहाराच्या वाहनाने गरजवंतांपर्यंत पोहोचविले जात आहेत. १० एप्रिलपासूनचा हा उपक्रम लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू राहील.