शहरातील गरजूंना आवश्यक मदत करा : फडणवीस यांची भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:43 AM2020-03-27T00:43:27+5:302020-03-27T00:44:33+5:30
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘ऑडियो ब्रिज’च्या माध्यमातून भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. ‘कोरोना’च्या लढ्यात सरकारी यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे व शहरातील गरजूंपर्यंत वेळेत पोहोचावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘ऑडियो ब्रिज’च्या माध्यमातून भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी दक्षिण-पश्चिम नागपूरच्या पदाधिकाऱ्यांशीदेखील मुंबईतून संवाद साधला. नागपूर शहरातील जंतुनाशक फवारणी, औषध पुरवठा, याबाबत त्यांनी पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा केली. ‘कोरोना’च्या लढ्यात सरकारी यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे व शहरातील गरजूंपर्यंत वेळेत पोहोचावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गुरुवारी दुसऱ्या टप्प्यात फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि शक्तीकेंद्र प्रमुखांशी संवाद साधला. यात नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि सुमारे हजार पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागपूर शहरातील जंतुनाशक फवारणी, गरजूंना अन्नवाटपाची स्थिती, औषध पुरवठा, सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात उपलब्धता इत्यादींबाबत त्यांनी सविस्तर चर्चा पदाधिकाºयांशी केली आणि प्रदेश स्तरावरील यंत्रणेशी संपर्क ठेवत समन्वयाने वरील सर्व क्षेत्रात काम करण्याच्या सूचना केल्या. कार्यकर्त्यांच्या विविध प्रश्नांना, शंकांनासुद्धा त्यांनी यावेळी उत्तरे दिली.
राज्याचादेखील घेतला आढावा
‘कोरोना’संदर्भात भाजपातर्फे सर्वच जिल्ह्यांत आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेचा आढावा आणि आणखी काय सुधारणा करता येईल, यासंदर्भात फडणवीस यांनी चर्चा केली. राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक या ऑडिओ ब्रिजला उपस्थित होते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारी यंत्रणेला मदत करीत अधिकाधिक लोकांना मदत करण्याबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
नऊ गरीबकुटुंबे दत्तक घ्यावीत
‘कोरोना’मुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. ही सारी कामे करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक जिल्ह्यात लोकांना भाजपाची एक हेल्पलाईन सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने नऊ परिवार दत्तक घेऊन त्यांना मदत करायची आहे, अशी स्पष्ट सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली.