आपल्या भागातूनच गरजूंची मदत करा : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:18 PM2020-03-28T23:18:26+5:302020-03-28T23:23:21+5:30
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फेदेखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गरजूंच्या मदतीसाठी काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भातच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, भाजपचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष व विधानसभा प्रभारींशी संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फेदेखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गरजूंच्या मदतीसाठी काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भातच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, भाजपचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष व विधानसभा प्रभारींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संबंधित जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला तसेच ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी आहे तेथेच राहून गरजूंना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
‘कोरोना’मुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ आहे. यामुळे खासगी आस्थापनांसह विविध कामेदेखील बंद आहेत. अनेक मजूर तसेच गावातील नागरिक परत जात आहेत. शिवाय हातावर पोट असलेल्यांसमोर मोठी अडचण उभी ठाकली आहे. अशा लोकांना तातडीने मदत करण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सूचना केली. भाजपातर्फे हाती घेण्यात आलेले सेवाकार्य आता तालुका पातळीपर्यंत नेण्यात येणार आहे. अनेक उपक्रम ठिकठिकाणी हाती घेण्यात आले आहेत. घरपोच औषध, रक्तदानाच्या उपक्रमात सहभाग, जिल्ह्यांच्या स्वतंत्र हेल्पलाईन, मास्क वितरण असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
वर्ध्यातील शेतकरी समस्या सरकारपर्यंत पोहोचवू
या संवादादरम्यान वर्धा जिल्ह्यातील शेतमालाच्या खरेदीचा मुद्दा चर्चेत आला. वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा शेतमाल नाफेड खरेदी करायला तयार आहे. पण, त्या खरेदीवर बंदी टाकण्यात आली आहे, याकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. हा विषय सरकारच्या कानावर घालण्यात येईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.