ग्रामीण भागात डिजिटल व्यवहारासाठी ‘सखी’ची मदत!
By गणेश हुड | Published: June 7, 2023 03:13 PM2023-06-07T15:13:59+5:302023-06-07T15:15:08+5:30
बँकात येण्याचा त्रास वाचला : रोजगारही उपलब्ध झाला
नागपूर : ग्रामीण भागात बँकांची सुविधा पोहचावी. लोकांना आर्थिक व्यवहार करता यावे. व्यवहार करताना घ्यावयाची काळजी जीवन सुरक्षा विमा, अटल पेन्शन योजना यासह विविध योजनांचा लाभ गरजुंना मिळावा. डिजिटल व्यवहार करता यावे, यासाठी उमेदच्या बी.सी. सखींनी मदतीचा हात पुढे केला आहे.
देशातील प्रत्येक नागरिक आर्थिक व्यवहारात डिजिटल साक्षर झाला पाहिजे यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतगर्त बँक करस्पोंडन्स सखीच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता मोहीम राबविली जात आहे.
ग्रामविकास विभागाने १ फेब्रुवारी ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान डिजिटल साक्षरता मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात उमेद अभियानाच्या माध्यमातून ५१ बँक करस्पोंडन्स सखी आणि इंडिया पोस्ट बँक करिता ८६ बँक करस्पोंडन्स सखी सध्या जिल्यात कार्यरत आहेत. त्यांच्या ध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला डिजिटल साक्षर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आजवर जिल्ह्यात ८६ जनजागृतीचे मेळावे यशस्वी केले आहेत. यात उमेद अभियानातील बँक करस्पोंडन्स सखी, बँक सखी, आर्थिक साक्षरता सखी यांच्या मदतीने आर्थिक व्यवहार करतांना घ्यावयाची काळजी, व्यक्तिगत बँक माहिती बाबतची सजगता, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा व अटल पेन्शन योजना यांचे महत्व सांगून विमा काढण्याचे फायदे लाभ आणि वार्षिक प्रीमियम याविषयी माहिती दिली.
बँकात येण्याचा त्रास वाचला
ग्रामीण भागातील विधवा, एकल, परितक्त्या महिला, वयोवृद्ध महिला पुरुष, अपंग यांना दिला जाणारा मासिक प्रोत्साहन पर भत्ता गावोगावी जाऊन काढून देतात. किंवा आपल्या सेंटरवरून काढून देतात. यामुळे ग्रामीण भागातील अशा नागरिकांना बँकेत येण्याचा त्रास कमी होतो.
सखींना रोजगार उपलब्ध झाला
ज्याठिकाणी बँक करस्पोंडन्स सखी करिता रिक्त जागा असेल अशा ठिकाणी काम करण्यास इच्छुक पात्र महिलेला रोजगाराची संधी निर्माण करून दिली जाते. ज्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वयं रोजगार मिळतो, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य होते, मुलांच्या शिक्षणासाठी वेळेवर सहाय्य करता येते. उभेद अभियानाच्या अशा या महत्वकांक्षी उद्देशाला यशस्वी करण्यासाठी जिल्हा तथा तालुक्यातील सर्व कर्मचारी सहभागी आहेत.